नवी दिल्ली - नुकतेच युपीएससी स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, महाराष्ट्राती 100 पेक्षा अधिक युवक-युवतींनी यश मिळवत देशात महाराष्ट्राची पताका फडकवली. या परीक्षेबद्दल अनेकांच्या मनात भीती असते, ही परीक्षा अतिशय अवघड असून देशातभरातून केवळ 700 ते 800 च विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेत उत्तीर्ण होतात. त्यामुळे, या परीक्षेतील प्रश्नांबद्दल, मुलाखतीबद्दल अनेकांना उत्सुकता असते. यंदा युपीएससी परीक्षेत चौथी रँक घेऊन उत्तीर्ण झालेल्या यश झुलका यांनी आपला मुलाखतीमधील एक अनुभव शेअर केला आहे.
UPSC परीक्षेच्या अंतिम मुलाखतीमधील प्रश्नांबद्दल आपण ऐकलंच असेल. या प्रश्नांना इंटेलिजेंट उत्तर देऊनच उमेदवाराला यश मिळतं. या परीक्षेत देशात 4 थ्या क्रमांकावर यश मिळवणाऱ्या झारखंडच्या यश झुलक यांसही असाच एक अटीतटीचा प्रश्न विचारण्यात आला होता. सध्या देशात सुरू असलेल्या सीबीआय आणि ईडीच्या कारवाईसंदर्भातील हा प्रश्न होता. त्यामुळे, या प्रश्नावरील उत्तरही तसेच अपेक्षित होते.
देशातील सीबीआय आणि ईडी या तपासयंत्रणा स्वतंत्र आहेत की नाही? असा प्रश्न यश यांना विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे ज्यावेळी यश यांची मुलाखत होती, त्यावेळीच एका मीडिया हाऊसवर ईडीची रेड पडल्याची बातमी आली होती. त्याअनुषंगानेच त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर यश यांनी स्पष्टपणे उत्तर दिले की, माझ्या मते भारतात सीबीआय आणि ईडी या तपास यंत्रणा अंशकालीन स्वतंत्र आहेत, येथील टॉप अधिकाऱ्यांची नियुक्ती ही सरकारच्याच माध्यमातून करण्यात येते. तर, अनेकदा या यंत्रणांकडून करण्यात आलेल्या रेडचे कारणही सर्वसामान्य लोकांना माहिती नसते. या उत्तरासह यश यांनी एक सूचनाही केली होती. त्यानुसार, संसदेत या यंत्रणांसाठी एक समिती असायला हवी, या समितीने संबंधित यंत्रणांनी कोणत्या कारणाने ही छापेमारी केली, काय ठोस पुरावा होता म्हणून ही कारवाई केली, हे स्पष्ट करावे. भलेही सर्वसामान्य नागरिकांपासून ते गोपनीय ठेवण्यात येईल. पण, विरोधी पक्षाला ते माहिती असायला हवं, असे उत्तर यश यांनी दिले होते.
दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, बिहारच्या शुभमकुमार याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, बिहारच्याच यश झुलका यांनी देशात 4 था क्रमांक पटकावला आहे. यश यांनी दिल्ली विश्वविद्यालायातून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे. तर 2019 मध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे युपीएससी परीक्षेसाठी कुठलेही कोचिंग क्लास न लावता त्यांनी हे यश मिळवले आहे.