अररिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या अररिया प्रचारसभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. या सभ्येमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी एअर स्ट्राईकवर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेसवर बाटला हाऊस चकमकीचा उल्लेख करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बाटला हाऊस संदर्भात काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा त्या चकमकीत शहीद झालेल्या जवानाचा अपमान नाही का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केला आहे. 26/11 ला मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याऐवजी काँग्रेसने हिंदूंना दहशतवाद या शब्दाशी जोडून राजकारण केले असा आरोप यावेळी पंतप्रधानांनी केला.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने नेहमी व्होट बँकेचे राजकारण केले आहे. दिल्लीच्या बाटला हाऊसमध्ये मध्ये भारतीय जवानांनी दहशतवादांची रणनीती उधवस्त केली. मात्र दहशतवाद्यांवर झालेल्या कारवाईने आनंद व्यक्त करण्याऐवजी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आले. या कारवाईत ज्या जवानांनी बाटला हाऊसमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांना ठार केलं. त्यात शहीद झालेल्या जवानांचा हा अपमान नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी जे वादग्रस्त विधान केले होते. यानंतर काँग्रेसने भाजपावर शहीदांचा अपमान केला असा आरोप केला होता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे भाष्य केले आहे.
निवडणुकीपूर्वी जे लोक पुरावे मागत होते ते लोक दोन टप्प्यातील मतदानानंतर निराश झाले आहेत. आता ते पुरावे मागत नाहीत. किती दहशतवादी मारले गेले हे विचारणं त्यांनी बंद केले आहे. देशातील मतदारांनी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर त्यांच्या तोंडाला कुलूप लावलं आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानानंतर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आत्ताच्या लोकसभेत विरोधकांची जेवढी संख्या आहे तेवढे तरी निवडून येतील का याची चिंता विरोधकांना लागली असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला.