गहलोत यांच्या निवडीबद्दल प्रश्नचिन्ह, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अन्य नावांचा विचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 05:56 AM2022-09-28T05:56:42+5:302022-09-28T05:57:15+5:30
कमलनाथ, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, खरगे, कुमारी सैलजा यांच्या नावांची चर्चा
नवी दिल्ली : राजस्थानमधील आमदारांच्या बंडखोरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पदासाठी आता कमलनाथ, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, खरगे, कुमार सैलजा आणि अन्य काही नावांचा विचार केला जात आहे.
कमलनाथ यांनी सांगितले आहे की, अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक नाही. दरम्यान, जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ न शकल्याने मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन हे सोमवारी दिल्लीत परतले. त्यांनी १०, जनपथ येथे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेही उपस्थित होते. चर्चेनंतर माकन म्हणाले की, जयपूरमध्ये रविवारी जी बैठक बोलविली होती, ती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सहमतीने बोलविली होती. याबाबतचा अहवाल मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळपर्यंत आम्ही सोपवू. सूत्रांनी सांगितले की, या अहवालाच्या आधारे शिस्तभंगप्रकरणी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या समर्थक असणाऱ्या काही नेत्यांविरुद्ध कारवाईच्या दिशेने पाऊल उचलले जाऊ शकते.
बन्सल यांनी मागविला अर्ज
- काँग्रेसचे कोषाध्यक्ष पवन कुमार बन्सल यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागविला आहे.
- बहुधा, ते कुणाचे तरी समर्थन करतील, अशी माहिती पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.
- तर, पक्षाचे नेते शशी थरूर यांनी सांगितले आहे की, ते ३० सप्टेंबर रोजी अर्ज दाखल करणार आहेत.
आम्ही एकनिष्ठ नसतो, तर सरकार पडले असते : जोशी
गहलोत समर्थकांनी वेगळी बैठक घेण्याला शिस्तभंग म्हटत आहेत. यावर सरकारचे मुख्य प्रतोद डॉ. महेश जोशी यांनी म्हटले आहे की, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. एकनिष्ठ राहिलो नसतो तर काँग्रेस सरकार केव्हाच पडले असते.