नवी दिल्ली - झारखंडचे काँग्रेस खासदार धीरज साहू सध्या चर्चेत आहेत. मात्र, धीरज हे कोणत्याही राजकीय कृतीमुळे नाही तर त्याच्या काळ्या पैशाच्या कमाईमुळे चर्चेत आहे. धीरज साहू यांच्या घरावर छापेमारी करताना आयकर विभागाने आतापर्यंत ३५१ कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून नोटांची मोजणी अजूनही सुरू आहे. काँग्रेस नेत्याकडे सापडलेल्या या बेहिशोबी मालमत्तेवरुन भाजपाने काँग्रेसवर पुन्हा एकदा भ्रष्टाचारी म्हणत टीका केलीय. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. आता, याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपा आमदारांचे नाव घेतले. त्यामुळे, ते आमदार संतप्त झाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस खासदारकडे सापडलेल्या संपत्तीवर भाष्य करताना, त्यावर कायदेशीर कारवाई होईल. पण, केवळ काँग्रेस नेत्यांकडेच ही संपत्ती सापडते का, भाजपा नेत्यांकडे ईडी, सीबीआयचे अधिकारी का जात नाहीत, असा सवाल राऊत यांनी केला. तसेच, जर इंडिया आघाडीच्या खासदाराकडे २०० कोटी आढळून आले असतील तर भाजपा नेत्यांकडे १ लाख कोटी रुपये काळा धन आढळून येईल, असे विधानही खासदार राऊत यांनी केले. यावेळी, त्यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं नाव घेत त्यांचा हजारो कोटींचा घोटाळा असल्याचं म्हटलं. त्यासोबतच, शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे यांचा १७८ कोटींचा घोटाळा आहे, राहुल कुल यांनीही घोटाळा केलाय, असे राऊत यांनी म्हटले. तसेच, ईडीकडे आम्ही सातत्याने तक्रार केलीय. मग, त्यांच्यावर कारवाई करा ना, असेही राऊत यांनी म्हटले. ईडी आणि सीबीआय केवळ भाजपला संरक्षण देण्यासाठी बनवली नाही.
दरम्यान, संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर आमदार प्रसाद लाड यांनी संताप व्यक्त केला. तसेच, संजय राऊत यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचंही लाड यांनी म्हटले.
रक्कम गोळा करण्यासाठी मोठा फौजफाटा
काँग्रेस खासदाराच्या कुटुंबाच्या मालकीच्या ओडिशा-आधारित डिस्टिलरी कंपनीविरुद्ध आयकर विभागाच्या छाप्यात जप्त केलेली रोकड पाच दिवसांच्या मोजणीनंतर ३५१ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. ६ डिसेंबर रोजी विभागाने छापेमारी सुरू केली होती. धीरज साहू यांच्यावर करचोरी आणि 'ऑफ-द-बुक्स' व्यवहाराचा आरोप आहे. धीरज साहूंच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यासाठी ८० जणांच्या ९ टीमचा सहभाग होता. जे पाच दिवस सतत काम करत होते. छाप्यादरम्यान, काही ठिकाणी रोख रकमेने भरलेली १० कपाटं सापडली, तेव्हा सुरक्षा कर्मचारी, चालक आणि इतर कर्मचाऱ्यांसह २०० अधिकाऱ्यांची आणखी एक टीम सामील झाली. मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की जप्त केलेली रोकड ओडिशातील वेगवेगळ्या बँक शाखांमध्ये जमा करण्यासाठी सुमारे २०० बॅग आणि ट्रंक वापरण्यात आल्या.