गुवाहाटी : ५८७ पोलीस उपनिरीक्षकपदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी आसाममधील भाजपचे नेते दिबान डेका यांना पोलिसांनी अटक केली. ही प्रश्नपत्रिका समाजमाध्यमावर झळकल्याचे लक्षात येताच २० सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली होती. याप्रकरणी दिबान देका (४३ वर्षे) या भाजप नेत्याला आसाममध्ये बाजाली जिल्ह्यातील पाताचार्कुंची येथून बुधवारी रात्री अटक करण्यात आली.
प्रश्नपत्रिकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर १० दिवसांनी गुवाहाटी क्राईम ब्रँचने ही कारवाई केली आहे. दिबान डेका हे आपल्या पत्नीसोबत प्रवास करीत असताना पोलिसांनी त्यांचे वाहन मध्येच अडवून दिबान यांना ताब्यात घेतले व पुढील चौकशीसाठी त्यांना गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे. डेका यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दिबान डेका हे भाजपचे पदाधिकारी नाहीत. ते पक्षाचे प्राथमिक सदस्य आहेत. डेका यांना भाजपने पक्षातून काढून टाकले आहे.विशिष्ट परीक्षार्थींना आधीच दिली प्रश्नपत्रिका20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेला तब्बल ६६ हजार उमेदवार बसणार होते. या परीक्षा घोटाळाप्रकरणी सीआयडी, क्राईम ब्रँचने गेल्या काही दिवसांत किमान १२ आरोपींना अटक केली आहे. दिबान डेका हे भाजप नेता त्यापैकी एक आरोपी आहेत. डेका यांनी प्रश्नपत्रिका मिळवून काही विशिष्ट परीक्षार्थींना ती दिल्याचा आरोप आहे.