ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - भोपाळमधील तुरुंगातून फरार झाल्यानंतर मारल्या गेलेल्या सिमीच्या आठ दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीवरून वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसने या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तर आपनेही या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी हे सर्व प्रकरण म्हणजे एक षडयंत्र असून, त्याची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला पाहिजे असे म्हटले आहे. "हे दहशतवादी तुरुंगातून पळाले की त्यांना कुठल्या षडयंत्रांतर्गत पळवण्यात आले हा तपासाचा विषय असला पाहिजे," असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.
तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनीही या चकमकीवर शंका घेतली आहे. "या चकमकीमध्ये सर्व फरार दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामुळे आपल्याला या घटनेबाबत आता कुठलीही माहिती मिळू शकत नाही. म्हणूनच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी," असे कमलनाथ म्हणाले. तसेच आपनेही या चकमकीवर शंका घेतली आहे. दहशतवादी मारले गेले हे चांगले झाले. मात्र आठ दहशतवाद्यांचे एकत्र पलायन करणे आणि काही वेळातच त्यांचे एकत्रितपणे एन्काऊंटर होणे, शंकास्पद आहे. सरकारकडे 'व्यापम' फॉर्म्युला होता म्हणायचं," असे ट्विट आपच्या महिला आमदार अलका लांबा यांनी केले आहे.
Now we cant get any info as all of them died, there should be a judicial probe to know how they escaped: Kamalnath (Cong) on Simi Terrorists pic.twitter.com/hHVtSN8uq8— ANI (@ANI_news) October 31, 2016