उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगावेळी चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडली. या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, आता याबाबत एसआयटीचा अहवाल समोर आला आहे. एसआयटीने ३०० पानी अहवाल सादर केला आहे. या अहवालात सत्संगाचे आयोजन करणाऱ्या समितीला लक्ष्य करण्यात आले आहे, तर अधिकाऱ्यांच्या उदासीनतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, या अहवालात सूरजपाल उर्फ साकार विश्व हरी याचा उल्लेख नाही. एसआयटीने ३०० पानांच्या अहवालात ११९ लोकांचे जबाब नोंदवले आहेत.
ग्रेनेड फेकले, १२ मिनिटं गोळीबार... ५ जवान शहीद; कठुआ दहशतवादी हल्ल्याची Inside Story
यामध्ये हाथरसचे डीएम आशिष कुमार, एसपी निपुण अग्रवाल, सत्संगासाठी परवानगी देणारे एसडीएम आणि सीओ सिकंदर राव आणि २ जुलै रोजी सत्संग ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांच्या वक्तव्यांचा समावेश आहे. याशिवाय सत्संगात मृतांच्या नातेवाईकांचे व जखमी भाविकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या अहवालात सत्संग आयोजित करणाऱ्या समितीने परवानगीपेक्षा जास्त लोक बोलावले. अपुरी व्यवस्था तसेच परवानगी असतानाही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी न करणे, या घटनेला जबाबदार धरले आहे. या एसआयटीमध्ये एडीजी आग्रा झोन अनुपम कुलश्रेष्ठ आणि अलीगडचे आयुक्त चैत्रा व्ही यांचा समावेश होता. या SIT ने हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणाचा तपास अहवाल सरकारला सादर केला आहे.
वकीलांनी केला मोठा दावा
याआधी सूरज पाल उर्फ साकार विश्व हरी बाबा यांचे वकील एपी सिंह यांनी हातरसमधील चेंगराचेंगरीवर एक नवीन वक्तव्य केले होते. १०-१२ जणांनी सत्संगामध्ये विषारी स्प्रे आणल्याचा दावा सिंह यांनी केला होता. विषारी फवारणी करून ते पळाले असून हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे दिसून येत आहे. हे सर्व लोक कारमधून पळून गेले. यामध्ये अनेक लोक बेशुद्ध झाले. या घटनेमागील लोकांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करावेत, तरच सूत्रधार उघड होईल. हा अपघात नसून मोठा कट असल्याचा दावा त्यांनी केला.