नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांची अमेरिका दौरा तीन दिवसांचा असेल. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून याची माहिती दिली. मोदी अमेरिकेला रवाना होताच सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी देशाशी खोटं बोलले की अमेरिका भेदभाव करतेय, असे दोन प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
देशात दुसऱ्या टप्प्यातलं लसीकरण १ मार्चपासून सुरू झालं. पंतप्रधान मोदी सकाळी एम्स रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी कोवॅक्सिन घेतली. अमेरिकेनं कोवॅक्सिनला मंजुरी दिलेली नाही. कोवॅक्सिन घेतलेल्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जात नाही. मोदींनी कोवॅक्सिन घेतलीय आणि अमेरिकेनं त्या लसीला मान्यताच दिलेली नाही. मग मोदी अमेरिकेला कसे जात आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सोशल मीडियावर वादळपंतप्रधान मोदींनी खरंच कोवॅक्सिनच घेतलीय ना, असा प्रश्न आता अनेकजण उपस्थित करत आहेत. अरमान नावाच्या एका व्यक्तीनं ट्विटरवर हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्या बायोमध्ये काँग्रेस कार्यकर्ता असा उल्लेख आहे. 'मोदींनी खरंच कोवॅक्सिन घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेली लस घेतलेल्या व्यक्तींनाच अमेरिकेत प्रवेश आहे. कोविशील्ड किंवा फायझरची लस घेतली असेल तरच मोदी अमेरिकेचा दौरा करू शकतात. म्हणजे मोदींनी पुन्हा भारताला मूर्ख बनवलं आहे?', असा सवाल अरमान यांनी विचारला आहे.
अमेरिकेच्या धोरणावर प्रश्नचिन्हकाही जणांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना टॅग करून प्रश्न विचारले आहेत. अमेरिका भेदभाव करत आहे का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी कोवॅक्सिनची लस घेतलेली असताना अमेरिकेत प्रवेश करू शकतात. मग बाकीचे भारतीय का करू शकत नाहीत? अमेरिकेची ही भूमिका भेदभाव करणारी असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.