Maharashtra Election Results 2024: महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू झाली आहे. झारखंडमध्ये काँग्रेसने प्रादेशिक पक्षांच्या मदतीने विजय मिळवला आहे. पण महाराष्ट्रात मात्र काँग्रेसला आपली विश्वासार्हता जपता आलेली नाही. महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचाही दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. मात्र काँग्रेस या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर करू शकली नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या निकालाने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.
महाराष्ट्रात १०१ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला केवळ १६ जागा मिळवता आल्या आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १४७ जागांवर लढून ४४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस पक्षाची पायाभरणी झालेल्या मुंबई शहरातच पक्षाची कामगिरी सर्वात वाईट ठरली आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी काँग्रेसला केवळ ३ जागा जिंकता आल्या आहेत. महाराष्ट्रात ७५ जागा अशा होत्या जिथे काँग्रेसची भाजपशी थेट लढत होती. तेथेही बहुतांश जागा भाजपच्या वाट्याला गेल्या. ७५ पैकी ६५ जागांवर काँग्रेस पराभूत झाली आहे.
दुसरीकडे, निकाल आल्यापासून पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पराभवासाठी नेतृत्वाला जबाबदार धरले. "आमचे नेतृत्व वाईट आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत काँग्रेसने ज्या आत्मविश्वासाने प्रवेश केला होता, त्यावरून निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचे दिसून येत होते, परंतु पक्षाच्या या अतिआत्मविश्वासानेच तो उतरवला. दुसरीकडे, भाजप नेते मैदानात उतरले आणि त्यांच्या मित्रपक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले," असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.
पोटनिवडणुकीत काँग्रेसने वायनाड आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. पण विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अनेक जागा गमावल्या. राजस्थान विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाने गेल्या वर्षी जिंकलेल्या तीन जागांपैकी तीनही जागा गमावल्या. त्याचप्रमाणे पंजाब पोटनिवडणुकीत जिंकलेल्या तीन जागाही गमावल्या. तर पंजाब, आसाम आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने प्रत्येकी एक जागा जिंकली. त्याचबरोबर कर्नाटकातील तीन आणि केरळमधील एका जागेवरही विजय मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त या वर्षी झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आता पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०१४ ते २०२४ दरम्यान झालेल्या ६२ विधानसभा निवडणुकांपैकी काँग्रेसचा ४७ निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. तर काँग्रेसला केवळ १५ निवडणुका जिंकता आल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत होती तिथे झालेल्या ४० विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने फक्त ७ निवडणुका जिंकल्या होत्या.