दिव्यांग कोट्यातील महिला अधिकाऱ्याचा जोरदार डान्स; व्हिडीओवर म्हणाल्या, "पेनकिलर घेऊन नाचते"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:09 IST2025-02-15T15:05:21+5:302025-02-15T15:09:54+5:30
४५ टक्के दिव्यांग असलेल्या महिला अधिकाऱ्याचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

दिव्यांग कोट्यातील महिला अधिकाऱ्याचा जोरदार डान्स; व्हिडीओवर म्हणाल्या, "पेनकिलर घेऊन नाचते"
Priyanka Kadam MPPSC:मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेवरुन सध्या गंभीर आरोप केले जात आहे. कारण मध्ये प्रदेश लोकसेवा आयोगाच्या एका महिला अधिकाऱ्याचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. महत्त्वाची बाब म्हणजे या महिला अधिकाऱ्याने दिव्यांग कोट्यातून ही नोकरी मिळवली आहे. त्यामुळे आता उत्पादन शुल्क अधिकारी प्रियांका कदम यांच्या निवडीवरुन शंका उपस्थित केली जात आहे. दुसरीकडे, प्रियांका कदम यांनी व्हायरल व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आपले अपंगत्व कायमस्वरूपी नसल्याचेही प्रियांका कदम यांनी सांगितले.
मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या उत्पादन शुल्क अधिकारी प्रियांका कदम यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. उत्पादन शुल्क अधिकारी प्रियांका कदमच्या डान्स व्हिडिओमुळे त्यांच्या भरतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांची दिव्यांग कोट्यातून निवड झाली होती. यावरुनच नॅशनल एज्युकेटेड युथ युनियनने मध्य प्रदेश लोकसेवा आयोग २०२२ च्या भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रियांका कदम यांची ऑर्थोपेडिक अपंग कोट्यातून निवड झाली. त्यांच्या डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या अपंगत्वावर आणि एमपीपीएससीच्या भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
व्हायरल व्हिडीओवरुन प्रश्न उपस्थित झाल्याने आता प्रियांका कदम यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रियांका कदम यांनी आपण ४५ टक्के अपंगत्व असल्याचा दावा केला आहे. एखाद्या व्यक्तीला मी पहिल्या दृष्टीक्षेपात सामान्य स्त्रीसारखी दिसते, पण मी केवळ जटिल शस्त्रक्रियेदरम्यान लावलेल्या इम्प्लांटमुळेच चालण्यास सक्षम आहे. डॉक्टरांच्या सूचनेनुसार मी पाच ते दहा मिनिटे डान्स करू शकते, असं प्रियांका कदम म्हणाल्या.
"मी एका सामान्य कुटुंबातील असून माझे वडील मजूर होते आणि आई शिवणकाम करते. सरकारी अधिकारी होण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. माझे अपंगत्व कायमस्वरूपी नाही. पूर्वी मी वॉकर, नंतर काठीच्या साहाय्याने चालायची, पण आता मला जास्त आधाराची गरज नाही. माझ्या दोन्ही पायांच्या हाडांना इजा झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याच्यामध्ये रॉड टाकण्यात आला. डॉक्टरांनी मला काठीच्या मदतीने चालण्याचा सल्ला दिला होता. पण मला आत्मविश्वासाने चालायचे आहे आणि म्हणूनच मी काठीचा वापर कमी केला. मला लहानपणापासूनच डान्सची आवड आहे. त्यामुळे ती पेनकिलर घेऊन ५-१० मिनिटे डान्स करते. वेदना वाढल्यावर मी पुन्हा पेनकिलर घेते. दिव्यांग मुलगीही नृत्य करू शकते," असं स्पष्टीकरण प्रियांका कदम यांनी दिलं.
कधीकधी मनोबल उंचावत राहण्यासाठी थोडासा डान्स करते, असंही प्रियांका कदम म्हणाल्या. त्या सध्या उज्जैन येथील कोषागार आणि लेखा विभागात सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी पदासाठी त्यांची निवड होऊनही सध्या सुरू असलेल्या शासकीय प्रक्रियेमुळे त्यांची त्या पदावर नियुक्ती झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.