लखनौ - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात इंडिया आघाडीचं सरकार येताच गरिब महिलांच्या खात्यावर खटाखट दर महिना ८५०० रुपये आणि वर्षाला १ लाख रुपये देणार अशी गॅरंटी राहुल गांधींनी दिली होती. ४ जूनला निकाल आल्यानंतर ५ जूनला लखनौच्या काँग्रेस मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने मुस्लीम महिलांनी गर्दी केली. या महिला काँग्रेसचं गॅरंटी कार्ड घेऊन कार्यालयात पोहचल्या आणि तिथे १ लाख रुपयांची मागणी केली.
या महिलांच्या हाती काँग्रेसचं गॅरंटी कार्ड होतं. त्या म्हणाल्या की, आमच्या खात्यात पैसे येणार म्हणून आम्ही काँग्रेसला मत दिले होते असं त्यांनी सांगितले. काँग्रेसकडून ५ गॅरंटी लोकांना देण्यात आली होती. त्यात गरीब महिलांच्या खात्यात वर्षाला १ लाख म्हणजे महिन्याला ८५०० रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेते ५ जुलैपासून सर्व गरीब महिलांच्या खात्यात ८ हजार रुपये खटाखट येतील असं सांगत होते.
महिलांचा आरोप
निवडणुकीच्या काळात काँग्रेसकडून महिलांना गॅरंटी कार्ड वाटप करण्यात आलं होतं. त्यात प्रत्येक शिक्षित युवकाला नोकरी, महालक्ष्मी योजनेतून गरीब महिलांच्या खात्यात १ लाख रुपये देण्याचं बोलले होते. काँग्रेसचं गॅरंटी कार्ड घेऊन मोठ्या प्रमाणात मुस्लीम महिला रांगेत उभ्या होत्या. आम्ही आमचे पैसे घेण्यासाठी आलोय असं त्या म्हणत होत्या. या महिलांना कधी ४ वाजता, कधी १२ वाजता या असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत होते.
या महिलांना एक फॉर्म निवडणुकीत देण्यात आला होता. तो फॉर्म भरून महिला निकालानंतर काँग्रेस कार्यालयात पोहचल्या. फॉर्म भरून कार्यालयात जमा करावा असं कार्यकर्त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मोबाईलवरही मेसेज पाठवले होते. आता हे फॉर्म आम्ही जमा करायला आलो तेव्हा कुणीच विचारलं नाही अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी दिली.
महिलांची रांग पाहून काँग्रेस खुश
आम्ही या महिलांची रांग पाहून खुश झालो, त्यांना राहुल गांधींवर विश्वास आहे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आमच्या गॅरंटी पूर्ण करू आणि या महिलांना त्यांचा हक्क देऊ. सध्या दिल्लीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. आमचे सरकार आलं तर आम्ही ठराविक काळात आश्वासन पूर्ण करू असं विधान ज्येष्ठ प्रवक्ते सीपी राय यांनी दिले.