नवी दिल्ली/मुंबई/ठाणे : मोदी सरकारने काळ्या पैशाविरुद्ध पुकारलेल्या युद्धात ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यावरून सुरू असलेला सावळागोंधळ आणखी तीन-चार आठवडे सुरू राहील, असे खुद्द वित्तमंत्री अरुण जेटली यांनीच सांगितल्याने आणि सोमवारी गुरुनानक जयंतीनिमित्त बँका बंद राहणार असल्याने नोटा जमा करण्यासाठी व दुसऱ्या नोटांच्या स्वरूपात हाती पडेल ती रोकड मिळविण्यासाठी रविवारी लोक गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत जास्त संख्येने बाहेर पडले. अशा वातावरणात भिवंडीतील जकातनाका येथील स्टेट बँकेत १००, २० आणि १० रुपयांच्या नोटा उपलब्ध असल्याचे समजल्याने सुमारे हजार-दीड हजार लोकांनी या शाखेकडे धाव घेतली. ग्राहकांमध्ये शिवीगाळ, धक्काबुक्की सुरू झाल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या सर्वच शहरांमधील बँकांबाहेर रविवारी नोटांसाठी दिवसभर शेकडो लोकांच्या रांगा लागल्या. भिवंडीतील काही बँकांमध्ये सध्या केवळ २००० रुपयांच्या नोटा ग्राहकांना दिल्या जात असून, या नोटा कुणीही सुट्या करून देत नाही. जकातनाका येथील स्टेट बँकेत १००, २० व १० रुपयांच्या नोटा मिळत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हजार ते दीड हजार लोकांनी तेथे गर्दी केली. त्यातून लोकांमध्ये धक्काबुक्की व शिवीगाळ सुरू झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांनी तत्काळ लाठीमार करून लोकांना पांगवले. त्यानंतर पोलिसांच्या देखरेखीखाली उपलब्ध सुट्या पैशांचे वाटप करण्यात आले. अंबरनाथमध्ये चिमुरड्याचा मृत्यूरुग्णालयांना चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्याचे सरकारचे सक्त आदेश असतानाही शनिवारी रात्री अंबरनाथमधील बुवापाडा परिसरात राहणाऱ्या चार वर्षीय विराट सिंह या चिमुकल्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला. तब्येत बिघडल्याने पालकांनी विराटला जवळील खासगी रुग्णालयात नेले. मात्र, सुट्या पैशांच्या समस्येमुळे रुग्णालय कर्मचाऱ्यांनी त्या मुलास दाखल करून घेण्यास नकार दिला. उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात फिरणाऱ्या बापाच्या कडेवरच विराटने अखेरचा श्वास घेतला. पेट्रोल पंप, सरकारी इस्पितळे, रेल्वे-एसटी बसची तिकिटे, वीजबिले, पालिका व सरकारचे कर इत्यादी ठिकाणी रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्याची मुदत सोमवारी संपत असल्याने, त्यानंतर हे व्यवहार करण्यासाठी रोकड कुठून आणायची, या चिंतेने लोकांना ग्रासले.देशभरातील सव्वादोन लाख एटीएम मशिन्सपैकी जेमतेम ४० टक्के मशिन्स सुरू असल्याने, दिवसाला प्रत्येक कार्डावर दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता येण्याची सवलत ही असंख्य लोकांच्या दृष्टीने मृगजळच ठरली. बँकांना रिझर्व्ह बँकेकडून आणि करन्सी चेस्टमधून जी काही रोकड उपलब्ध झाली, ती त्यांनी चालणाऱ्या एटीएममध्ये भरली, पण तिची अवस्था ‘दर्या मे खसखस’ अशी होती. धास्तावलेले लोक घरातील चार-पाच कार्ड घेऊन आले व जेथे शक्य आहे, तेथे त्यांनी प्रत्येक कार्डावर दोन हजार रुपये काढून पुढच्या दोन-चार दिवसांची सोय केली. यामुळे नोटा भरलेली एटीएम काही मिनिटांतच रिकामी होत राहिली. ज्यांनी बँकांच्या काउंटरवरून पैसे काढले, त्यांनाही अनेक बँकांनी दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा दिल्याने, या नोटांनी किरकोळ व्यवहार कसे करायचे, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. गेले चार दिवस सर्व बँकांमध्ये फक्त रद्द नोटा जमा करून घेणे व त्या बदल्यात थोड्या-फार दुसऱ्या नोटा देणे याखेरीज अन्य कोणतेही कामकाज झालेले नाही. पुढील काही आठवडे अशीच परिस्थिती राहणार आहे. संपूर्ण बँकिंग व्यवस्था अशा प्रकारे लकव्याच्या स्थितीत राहण्याने, अर्थव्यवस्थेवर किती विपरित परिणाम होणार आहे, याचे गणित अद्याप कोणी केलेले नाही, परंतु या निर्णयाने लोकांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाखेरीज बरीच मोठी किंमत देशाला मोजावी लागू शकते, असे चित्र आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोदी सरकार थोडे नमले; अधिक पैसे काढण्याची मुभा-पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या रातोरात घेण्यात आलेल्या निर्णयाने संपूर्ण देशभर उद््भवलेली अराजकसदृश परिस्थिती आणि लोकांचा संपत चाललेला संयम याची दखल घेत मोदी सरकारने रविवारी रात्री थोडे नमते घेतले आणि नोटा बदलण्यावर व पैसे काढण्यावर घातलेली मर्यादा थोडी शिथिल करून त्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.गेल्या चार दिवसांच्या परिस्थितीचा, नव्या व पर्यायी नोटांच्या उपलब्धतेचा आणि एटीएम यंत्रांच्या फेररचनेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयाने हे दिलासादायक नवे निर्णय रविवारी रात्री जाहीर केले.
नोटांसाठी रविवार रांगेत
By admin | Published: November 14, 2016 5:56 AM