नवी दिल्ली - भारत-पाक यांच्यातील तणाव वाढल्यामुळे पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरु आहे. मात्र पाकच्या गोळीबारीला भारताकडून जशास तसं प्रत्युत्तर देणं सुरु आहे. जम्मू काश्मीरच्या कृष्णा घाटी, मेंढर सेक्टरमध्ये पाककडून गोळीबार सुरु आहे. पाकच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यात पाकिस्तानी सैन्यातील जवानही मारले गेल्याची माहिती आहे.
मंगळवारी दुपारी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारतीय जवान रवी रंजन कुमार सिंह शहीद झाले आहेत. ३६ वर्षीय रवी रंजन कुमार हे बिहारच्या गोप बीघा गावात राहणारे आहेत. त्यांच्यामागे त्यांची पत्नी रिता देवी आणि मुलं असं कुटुंब आहे.
बॉर्डरवर पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरु असून भारतीय जवानही पाकच्या हल्ल्याला आक्रमक उत्तर देत आहेत. काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राजौरी सेक्टरमध्ये पाक सेनेची एक चौकी उद्ध्वस्त करण्यात आली. पाककडून वारंवार होणाऱ्या हल्ल्याला भारताने जशास तसे उत्तर देण्याचं ठरवलं आहे. १५ ऑगस्टच्या दिवशीही जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तानकडून दिवसभर गोळीबार सुरु होता. उरी आणि राजौरी या भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं. त्यावेळी पाकिस्तानचे ३ जवान भारताने ठार मारले.
भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने आंततराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांमध्ये नाचक्की झाल्याने आता पाकिस्तानने आपला मोर्चा काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याकडे वळवला आहे.