Qutub Minar: दिल्लीतील कुतुब मिनारच्या मशिदीबाबत वाद वाढला आहे. या ठिकाणी कुव्वत-उल-इस्लाम आणि मुघल मशीद, अशी दोन मशिदी आहेत. या महिन्यात मुघल मशिदीत नमाज पठण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर कुव्वत-उल-इस्लाम मशिदीमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा केला जात असून, या ठिकाणी पूजा करण्याची मागणी हिंदू पक्षाकडून करण्यात येत आहे. दोन्ही मशिदींची प्रकरणे वेगळी आहेत. कुव्वत-उल-इस्लाम मशिदीत नमाज पठण केली जात नाही, फक्त मुघल मशिदीत नमाज अदा होते. यावरही सध्या बंदी घालण्यात आली आहे. सध्या न्यायालयात सुरू असलेला वाद कुव्वत-उल-इस्लाम मशिदीशी संबंधित आहे. साकेत कोर्टाने या प्रकरणाचा निर्णय राखीव ठेवला असून, 9 जुन रोजी यावर निर्णय होणार आहे.
हिंदू पक्षाचा दावा आणि मागणी काय आहे? कुव्वत-उल-इस्लाम मशीद प्रकरणी मंगळवारी दिल्लीच्या साकेत कोर्टात सुनावणी झाली. हिंदू पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की, कुतुबुद्दीन ऐबकने 27 मंदिरे उद्ध्वस्त करून कुतुबमिनार संकुलात कुव्वत-उल-इस्लामची स्थापना केली होती. ही मशीद देव-देवतांच्या मूर्ती तोडून बांधण्यात आली आहे, त्यामुळे आम्हाला तेथे पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा, असा युक्तिवाद हिंदू बाजूने करण्यात आला. तसेच, आम्हाला या ठिकीणी कोणतेही मंदिर बांधायचे नाही, फक्त पूजा करण्याचा अधिकार हवा आहे, अशी मागणी हिंदूंची आहे.
कोर्टात काय युक्तिवाद झालाहिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन म्हणाले की, कुव्वत-उल-इस्लाम मशीद 27 मंदिरे तोडून बांधण्यात आल्याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. मुस्लिमांनी येथे कधीही नमाज अदा केली नाही. मुस्लिम आक्रमकांना मंदिरे पाडून आणि मशिदी बांधून इस्लामची ताकद दाखवायची होती. भगवान गणेश, विष्णू आणि यक्ष यांच्यासह हिंदू देवतांच्या स्पष्ट प्रतिमा आणि मंदिराच्या विहिरीजवळ कलश आणि पवित्र कमळ यांसारखी अनेक चिन्हे असल्याचा दावा हिंदू पक्षाच आहे.
न्यायालयाचा सवाल...यावेळी न्यायाधीशांनी हिंदू पक्षकारांना विचारले की, तुम्ही कोणत्या कायद्यानुसार येथे पूजेचा अधिकार मागत आहात? यावर हरिशंकर जैन म्हणाले की, आम्हाला इथे कुठलेही मंदिर बांधायचे नाही, फक्त पूजा करण्याचा अधिकार हवा आहे. मुस्लिम आक्रमकांनी मूर्ती तोडून मशीद बांधली, पण आजही आम्ही तिथं मंदिर असल्याचे मानतो. या परिसरात किमान 1600 वर्षे जुना लोखंडी खांबही आहे. त्या मिश्रधातूच्या स्तंभावर संस्कृत पौराणिक लिपीमध्ये श्लोकही लिहिलेले आहेत.
काय म्हणाले ASIएएसआयचे वकील सुभाष गुप्ता म्हणाले की, अयोध्या निकालातही असे म्हटले आहे की, जर स्मारक असेल तर त्याचे स्वरुप बदलता येणार नाही. संरक्षित स्मारकात कोणतीही धार्मिक पूजा करता येणार नाही. त्यामुळे याचिका फेटाळण्यात यावी. एएसआयने सांगितले की, एखाद्या स्मारकाच्या ठिकाणी पूजेसाठी परवानगी आहे की नाही, हे स्मारकाचा दर्जा मिळाल्याच्या दिवसापासून ठरवले जाते. कुतुबमिनार हे निर्जीव स्मारक आहे, जेव्हा ते एएसआयच्या संरक्षणात आले तेव्हा तेथे कोणतीही पूजा केली जात नव्हती.
कुतुब मिनार पुजेचे ठिकाण नाही...एएसआयने सांगितले की, मशिदीवर केलेले कोरीवकाम दाखवते की मशीद 27 मंदिरांच्या अवशेषांवरून बांधली गेली आहे. पण मंदिर पाडून मशीद बांधली असे कुठेही लिहिलेले नाही. मात्र, मशिदीसाठीचे साहित्य तेथे होते की अन्य ठिकाणाहून आणले होते, याचीदेखील माहिती उपलब्ध नाही. कुतुबमिनार हे प्रार्थनास्थळ नाही, त्यामुळे हिंदू बाजूचे वकील जैन यांची याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी एएसआयने केली आहे.