कर्नाटककाँग्रेसचे कार्याध्यक्ष आर ध्रुवनारायण ( वय- ६१) यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ध्रुवनारायण सकाळी म्हैसूर येथील त्यांच्या निवासस्थानी होते, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डीआरएमएस हॉस्पिटलचे डॉ. मंजुनाथ यांनी या बातमीला दुजोरा दिला.
आर ध्रुवनारायण यांच्या सकाळी अचानक छातीत दुखू लागले, त्यानंतर त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना डीआरएमएस रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आर ध्रुवनारायण यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विट करुन श्रद्धांजली दिली वाहिली. आर ध्रुवनारायण यांच्या निधनामुळे दु:ख आणि वेदना झाल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 'ते केवळ तळागाळातील राजकारणीच नव्हते तर एक महान व्यक्तीही होते. त्यांच्या निधनाने केवळ काँग्रेसचे नुकसान झाले नाही तर ते माझे वैयक्तिक नुकसानही आहे.'असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आर ध्रुवनारायण यांच्या निधनाच्या वृत्तानंतर, रणदीप सुरजेवाला यांनीही ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. 'नेहमी हसतमुख मित्र, आमचे नेते आणि काँग्रेसचे सर्वात समर्पित सैनिक, ध्रुवनारायण यांचे निधन हे काँग्रेससाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. याचे वर्णन कोणत्याही शब्दात करता येणार नाही. ध्रुवनारायण हे दलितांचे चॅम्पियन असल्याचे वर्णन करताना सुरजेवाला म्हणाले. 'ध्रुवनारायण यांनी आपले जीवन गरिबांसाठी समर्पित केले. मित्रा आम्ही तुझी नेहमीच आठवण काढू, असंही त्यांनी म्हटले आहे.