"राजीव गांधी दोनदा नापास झाले, तरीही काँग्रेसनं त्यांना पंतप्रधान बनवलं’’, मणिशंकर अय्यर यांचा स्वपक्षालाच टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:26 IST2025-03-05T19:25:06+5:302025-03-05T19:26:11+5:30
Mani Shankar Aiyer News: वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या एका विधानामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी किंवा कुठल्या विरोधी पक्षातील नेत्याला नाही तर स्वत:च्या पक्षातीलच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे.

"राजीव गांधी दोनदा नापास झाले, तरीही काँग्रेसनं त्यांना पंतप्रधान बनवलं’’, मणिशंकर अय्यर यांचा स्वपक्षालाच टोला
वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या एका विधानामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी किंवा कुठल्या विरोधी पक्षातील नेत्याला नाही तर स्वत:च्या पक्षातीलच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे. मणिशंकर अय्यर यांच्या या विधानामुळे काँग्रेसची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर देशाचं नेतृत्व करणाऱ्या राजीव गांधींच्या पात्रतेबाबत मणिशंकर अय्यर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच अशा व्यक्तीला देशाचं पंतप्रधान बनवलं गेलं, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे. राजीव गांधी यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, राजीव गांधी एक विमान वैमानिक होते. मात्र ते दोन वेळा नापास झाले होते. केंब्रिज विद्यापीठात नापास होणं तसं कठीण आहे. कारण विद्यापीठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतं. तरीही राजीव गांधी नापास झाले. त्यानंतर ते इंपिरियल कॉलेज लंडन येथे शिक्षणासाठी गेले. तिथेही ते अपयशी ठरले. असा व्यक्तीला भारताचं पंतप्रधान कसं काय बनवलं गेलं, असा प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला.
मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे खासदार कुंवर दानिश अली यांनी सांगितले की, राजीव गांधी यांना देशात आयटी क्रांती आणि आधुनिकरणासाठी ओळखलं जातं. त्यांनी पंचायत राजची सुरुवाती केली होती.
दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या विधानानंतर भाजपा नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. मणिशंकर अय्यर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करताना अमित मायवीय यांनी लिहिले की, राजीव गांधी हे शैक्षणिकदृष्ट्या संघर्ष करत होते. केंब्रिज आणि इंपिरियल कॉलेज दोन्ही ठिकाणी ते अयशस्वी ठरले. तरीही त्यांना पंतप्रधान बनवण्यात आलं. गुपित उघड होऊ द्या, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.