नवी दिल्ली, दि. 28 - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना मिळणा-या विशेष सुविधा रद्द करुन केंद्रातील मोदी सरकारने जोरदार दणका दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बिहारच्या राजकरणात अनेक घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुद्धा लालूप्रसाद यादव यांना दणका देत महाआघाडीतून बाहेर पडून थेट भारतीय जनता पार्टीला सोबत घेऊन पुन्हा सरकार स्थापन केले. देशातील विमानतळांवर ३० प्रकारच्या व्हीआयपी श्रेणीतील व्यक्तींना विशेष सूट दिली जाते. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसारख्या लोकांचा समावेश असतो. या व्हीआयपींना एसपीजीची विशेष सुरक्षाही पुरवली जाते. याशिवाय त्यांना विमानापर्यंत जाण्यापर्यंत कोणत्याही सुरक्षेशिवाय ते विमानातही जाऊ शकतात. या सुविधेचा लाभ लालूप्रसाद यादव यांना सुद्धा मिळत होता. विशेष म्हणजे, या यादीत नाव समाविष्ट नसूनही गेल्या आठ वर्षांपासून पाटणा विमानतळावर लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडीदेवी यांना ही सुविधा पुरवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही गोष्ट प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर गेल्या शुक्रवारपासून लालूंना ही सुविधा काढून घेण्यात आली. 2009 मध्ये यूपीए सरकारच्या काळात लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांना ही सुविधा देण्यात आली होती. मात्र, गेल्या आठवड्यात ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटीकडे (बीसीएएस) यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेण्यात आली असून ही सुविधा रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे, लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांमागे भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचा ससेमिरा सुरु आहे. बेनामी संपत्तीप्रकरणी आयकर विभागाने लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांची आधीच 180 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच, आयकर विभागाने त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, मनी लाँडरिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावरुन लालूप्रसाद यादव यांनी केंद्रातील मोदी सरकारने आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोपही केला आहे.