एस. पी. सिन्हानवी दिल्ली : रेल्वेमध्ये नोकरी देण्याच्या बदल्यात त्या उमेदवारांच्या जमिनी माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांच्या कुटुंबातील सदस्य व त्यांच्या कंपनीच्या नावे केल्याच्या प्रकरणात बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची सीबीआयने सोमवारी सुमारे चार तास सखोल चौकशी केली. याचप्रकरणी लालूप्रसाद यादव यांचीही उद्या, मंगळवारी चौकशी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सीबीआयने याआधीच विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
त्यात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, राबडीदेवी यांच्यासह १६ जणांना आरोपी करण्यात आले आहे. लालूप्रसाद यादव, राबडीदेवी, त्यांची मुलगी मीसा भारती यांना १५ मार्च रोजी हजर होण्याचे न्यायालयाने समन्स बजावले आहे. या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांचे ओएसडी भोला यादव यांना सीबीआयने गेल्या २७ जुलै रोजी अटक केली होती. पुढील तपासासाठी यादव कुटुंबाकडून आणखी काही कागदपत्रे मागविण्यात येणार असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.