नवी दिल्ली, दि. 16- सुपरबाईकवरून शर्यत लावणं एका तरूणाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. ही शर्यत सुरू असताना अपघात होऊन एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे. दिल्लीतील मंडी हाऊस परिसरात मित्रांबरोबरच्या शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हा संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
दिल्लीतील कॅनॉट प्लेस ते मंडी हाऊसदरम्यान सोमवारी रात्री गाजी, लक्ष्य आणि हिमांशू (वय २४) या तिघांनी सुपरबाईकवर शर्यत लावली होती. हे तिघेही अती वेगात गाडी चालवत होते. लेडी इरविन कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ ते आले असताना हिमांशूचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. आणि गाडीसह तो कॉलेजच्या भिंतीवर आपटला. या अपघातात जखमी झालेल्या हिमांशूचा मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण अपघात हिमांशूच्या लक्ष्य या मित्राने घातलेल्या हेल्मेटमधील गो-प्रो कॅमेऱ्यात कैद झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या व्हिडीओमध्ये ही शर्यत नेमकी कशी झाली? हे स्पष्टपणे दिसतं आहे. अति वेगाने गाडी चालविणाऱ्या हिमांशूने अनेक वाहनांना ओव्हरटेक केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. मंडी हाऊस परिसरात हिमांशु आला तेव्हा त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि तो भिंतीवर आदळला. हिमांशू आणि त्याचे मित्र रात्री पार्टीहून परतत होते. त्यावेळी त्यांनी शर्यत लावली. लक्ष्यच्या हेल्मेटवर कॅमेरा लावण्यात आला होता. त्यात ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त बी. के. सिंह यांनी दिली.
आणखी वाचा
केरळमध्ये चक्क ड्रिंक अँड ट्रॅ्व्हलवरही' बंदी
'रोहित वेमुला दलित नव्हता, आत्महत्या वैयक्तिक कारणामुळे’
या तीन मित्रांमध्ये शर्यत लावण्याचं ठरल्यावर लक्ष्यने त्याच्या हेल्मेटवर असलेला कॅमेरा सुरू केला होता. हिमांशू आणि गाजी यांच्यात शर्यत सुरू झाल्यावर लक्ष्यने ती शर्यत रेकॉर्ड करण्यासाठी त्या दोघांचा पाठलाग केला. ते तिघे सिकंदरा रोडवर पोहचल्यावर एक वयस्कर व्यकती मंडी हाऊस मेट्रो स्टेशनजवळून रस्ता क्रॉस करत होती. त्या माणसाला गाडीची धडक बसू नये म्हणून त्याने उजव्या बाजूने गाडीचं हॅण्डल वळविलं. पण तरिही त्या रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीच्या मनगटालला गाडीचं हॅण्डल लागलं. त्यामुळे हिमांशूचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, अशी माहिती लक्ष्यने पोलिसांना दिली.