नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत दिल्ली आणि मुंबईमध्ये ईशान्येकडील राज्यांमधील युवक आणि युवतींवर झालेले हल्ले किंवा त्यांच्यासोबत करण्यात आलेली गैरवर्तणूक म्हणजे वांशिक हल्ले होते, असे सरकार मानत नाही. परंतु २०१४ आणि २०१५ मध्ये मध्य प्रदेशात वांशिक हल्ले झाल्याचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. या राज्यात २०१४ मध्ये १९ आणि २०१५ मध्ये १० वांशिक हल्ले झाले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीनुसार ‘पोलीस’ आणि ‘सार्वजनिक सुव्यवस्था’ हा राज्याचा विषय आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालणे, त्यांचा तपास करणे, गुन्हा दाखल करणे आणि खटला दाखल करण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांची असते, असे चौधरी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पोलिसांना कारणे दाखवा नोटीसमुंबईत २ मार्च २०१६ रोजी मणिपुरी युवतीवर हल्ला करण्यात आला होता. तिच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात रवी जाधव नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे. तिच्यावर हल्ला होत असताना तेथे उपस्थित पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. त्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
वांशिक हल्ले केवळ मध्य प्रदेशमध्येच
By admin | Published: May 04, 2016 2:06 AM