ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ६ - बंगळुरूमध्ये जमावाने एका टांझानियन तरूणीवर हल्ला केल्याची घटना अद्याप ताजी असतानाच हैदराबादमध्ये १४-१५ जणांनी एका २६ वर्षीय नायजेरियन तरूणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी ओरोल्बे इबिडोला या पीडित तरूणाने पोलिसांत तक्रार नोंदवली असून आपली काहीच चूक नसताना १५ जणांच्या समूहाने आपल्याविरोधात वर्णद्वेषी टिप्पणी करत हल्ला केला, असे तक्रारीत नमूद केले आहे. तर त्या तरूणासह इतर दोन नायजेरियन युवकांनीच आपल्याला मारहाण केल्याचे सांगत आरोपींमीच नायजेरियन तरूणांविरोधात उलट तक्रार दाखल केली.
'बंजारा हिल्स येथील हकीमपेट भागातील पॅरामाऊंट कॉलनी येथून परत येत असताना गुरूवारी रात्री ८.३० च्या सुमारास तोलीचौकीजवळ उभ्या असलेल्या काही तरूणांनी आपल्याविरोधात वर्णद्वेषी टिप्पणी केली. त्याबद्दल मी त्यांना जाब विचारला असता त्यांनी मला मारहाण करण्यास सुरूवात केली' असे इबिडोलाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ' मात्र तेवढ्याच माझा शेजारी आला व त्याने माझी सुटका केली. पण थोड्या वेळानंतर त्या तरूणांना मला पुन्हा गाठले आणि मारहाण करत वर्णद्वेषी टिप्पणी केली. त्याचवेळेस माझे दोन नायजेरियन मित्र तेथे पोहोचले व त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्या १५ तरूणांपुढे त्यांचाही टिकाव लागला नाही आणि त्यांनी आम्हा सर्वांना बेदम मारहाण केली' असा जवाब त्याने तक्रारीत नोंदवल आहे. त्या तरूणांनी या प्रकाराची व्हिडीओ क्लिपही पोलिसांना सोपवली आहे.
मात्र या प्रकरणी त्या आरोपींनी त्या नायजेरियन तरूणांबद्दल उलट तक्रार नोंदवत रस्त्यावर झालेल्या एका छोट्याशा वादानंतर त्या तीन तरूणांनीच आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.