राज्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदा तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात शिवजयंती साजरी करण्यात आली. आग्र्यातील किल्ल्यातही यंदा शिवजयंती महोत्सव रंगल्याचं पाहायला मिळालं. तर, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील येथे शिवसृष्टीचे लोकार्पण करत आपण शिवप्रेमी आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचे भक्त असल्याचंही ते म्हणाले. एकंदरीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे जल्लोष पाहायला मिळाला. मात्र, राजधानी दिल्लीतील जेएनयुमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी एबीव्हीपी आणि एसएफआयच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. यावेळी, लेफ्ट कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा खाली फेकल्याचा आरोप एबीव्हीपीने केला आहे. मात्र, एसएफआने हे आरोप फेटाळले आहेत.
राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीत एबीव्हीपी आणि डाव्यांमध्ये नेहमीच वाद होताना पाहायला मिळते. आता, विद्यापाठीत शिवजयंती साजरी करण्यावरुन वाद झाला. एबीव्हीपीने काही फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये, शिवाजी महाराजांचा प्रतिमा खाली पडल्याचं दिसून येतं, तिथेच फुलेही दिसतात. जेएनयुमध्ये विद्यार्थी छात्र सेनेकडून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा असा अवमान करण्यात आल्याचा आरोप एबीव्हीपीने केला आहे. तसेच, या घटनेचा निषेध नोंदवत संबंधितांवर विद्यापीठाने कारवाई करावी, अशी मागणीही एबीव्हीपीने केली आहे.
एपीबीव्हीच्या आरोपानंतर आता लेफ्टनेही प्रतिक्रिया दिली असून एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनीच आम्हाला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. एसएफआयने दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी कँडल मार्च काढला होता. जातीवादी दूषित वातावरणामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याचा निषेध या मोर्चातून नोंदवण्यात येत होता. मात्र, एबीव्हीपीने हा शांततेतील मोर्चा भंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एबीव्हीपीने हा आरोप फेटाळला आहे. मात्र, शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी आणि जयंतीउत्सवातच हा वाद झाल्याने वातावरण तणावाचे निर्माण झाले होते.
दरम्यान, 'अभाविपकडून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे. मात्र, अभाविपने अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यापूर्वीच याठिकाणी काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शिवाजी महाराजांची प्रतिमा हटवण्यात आली', अशी प्रतिक्रिया एनएनयुआय सचिवांनी दिली.