ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ७ - इराक व सिरीयात नरसंहार घडवणा-या इसिस या दहशतवादी संघटनेने आता भारतातही दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला असून भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व वरिष्ठ पोलिस अधिकारी या संघटनेच्या रडारवर आहेत. मध्यप्रदेशमध्ये इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक केलेल्या पाच जणांच्या चौकशीतून ही माहिती उघड झाली आहे.
भारताच्या गुप्तचर यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली मध्यप्रदेश पोलिसांनी गेल्या महिनाभरात पाच जणांना अटक केली आहे. हे पाचही तरुण हे इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या पाच संशयित दहशतवाद्यांना इंडियन मुजाहिदीनच्या माजी सदस्याने ऑनलाइन चॅटिंगद्वारे त्यांचे ब्रॅन वॉश केल्याचे माहितीही समोर आली आहे. या पाचही तरुणांना बंदूक चालवण्याचे तसेच आयइडी बाँम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांना भाजपा व संघाच्या वरिष्ठ नेत्यांवर हल्ला करायला सांगितले होते असा दावाही मध्य प्रदेश पोलिसांनी केला आहे.