मुंबई - ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक कुलदीप नय्यर यांचे काल निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या सात ते आठ दशकांचा भारताचा चालताबोलता इतिहास आणि पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
कुलदीप नय्यर यांचा जन्म पंजाब प्रांतामध्ये सियालकोट येथे १४ आॅगस्ट १९२३ झाला होता. फाळणीनंतर आता सियालकोट पाकिस्तानामध्ये आहे. बी. ए आणि एलएलबीचे शिक्षण लाहोरमध्ये घेतल्यावर त्यांनी नाॅर्थवेस्टर्न विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते. ते द स्टेस्टमॅन या वर्तमानपत्राच्या दिल्ली आवृत्तीचे संपादक होते. अनेक इंग्रजी वर्तमानपत्रांत त्यांनी लेख लिहिले आणि विविध विषयांची ओळख भारतीयांना करुन दिली. ते इंग्लंडमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नेमले गेले, त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणूनही भूमिका बजावली होती. पत्रकारितेच्या महत्त्वाच्या योगदानात त्यांनी भारताची फाळणी करणार्या सिरिल रॅडक्लिफची घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली होती.
लंडनमधील बाँड स्ट्रीटवर रॅडक्लिफला भेटायला नय्यर गेले होते. भारताच्या फाळणीच्या वेळेस झालेली घाई आणि धांदल यावर बरीच माहिती त्यांना यामधून मिळाली होती. भारताची फाळणी करणा-या रॅडक्लिफ यांना भारताच्या भौगोलिक, सामाजिक रचनेबाबत काहीही माहिती नव्हती फाळणीच्या अगदी काही दिवस आधी ते भारतात येऊन पोहोचले होेेेते. अत्यंत ढोबळ विभागणी करुन ते घाईने परतले. रॅडक्लिफ यांनी फाळणी केल्यावर एका सहकार्याने त्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून दिली. पाकिस्तानला कोणतेही मोठे शहर मिळालेले नाही हे लक्षात आणून दिल्यावर त्यांनी लाहोर पाकिस्तानला द्यायचे ठरवले. अन्यथा लाहोर भारतातच राहिले असते.
फाळणीच्यावेळेस सरकारने सोपवलेले काम पूर्ण करण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नव्हते असेही त्यांनी नय्यर यांना सांगितले होते. मात्र नंतर या फाळणीमुळे लाखो लोकांना प्राण गमवावे लागल्याचे समजताच आपल्याला दुःख झाले असे सिरिल यांनी नय्यर यांना सांगितले होते. माझ्याकडे दोन-तीन वर्षांचा अवधी असता तर फाळणी नीट करता आली असती असेही रॅडक्लिफ यांनी सांगितले होते. रॅडक्लिफ यांनी फाळणीचे 'काम' केल्याबद्दल ब्रिटिश सरकारने दिलेले ३००० पौंड नाकारले होते.
नय्यर यांनी अनेक राजकीय प्रश्नांवर भाष्य केले होते. बांगलादेश निर्मितीच्यावेळेस स्थानिकांवर झालेले अत्याचार असो वा अण्णा हजारे यांचे आंदोलन, ते व्यक्त होत राहिले. अनेकदा त्यांच्या भूमिकेमुळे वादही निर्माण झाले. बियाँड द लाइन्स, इंडिया अफ्टर नेहरु, वॉल ऑफ वाघा, द जजमेंट, द मार्टियर, इंडिया पाकिस्तान रिलेशन अशी १५ पुस्तके त्यांनी लिहिली.