नवी दिल्ली - राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांनी काही दिवसांपूर्वी गायीच्या शेणापासून तयार केलेली चिप लॉन्च केली. या चिपमुळे मोबाईलमधून पसरणारे रेडिएशन कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला. कथिरिया यांनी 'कामधेनू दीपावली अभियाना'ची घोषणा केली. यावेळी त्यांनी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेली अनेक उत्पादनं लॉन्च केली होती. मात्र आता तब्बल 600 शास्त्रज्ञ आणि विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी कामधेनु आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांना पत्र लिहून त्यांचा हा दावा सिद्ध करण्याचे आवाहन केले आहे.
'इंडिया मार्च फॉर सायन्स'ने या संदर्भात वैज्ञानिक प्रयोग केव्हा आणि कोठे झाले आहेत? तसेच या संधोधनातील प्रमुख संशोधक कोण होते? या बाबतची माहिती मागितली आहे. यासोबतच गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या या चिपबाबत करण्यात आलेल्या अभ्यासाबाबतचे परिणाम कोठे प्रसिद्ध झाले या प्रश्नाचे उत्तर देखील इंडिया मार्च फॉर सायन्सने मागितले आहे. उत्पादनं लॉन्च करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कथिरिया यांनी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या चिपचे फायदे सांगितले होते.
गायीच्या शेणापासून तयार केलेली चिप लॉन्च; मोबाईल रेडिएशन कमी करत असल्याचा दावा
"गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेली चिप तुम्ही मोबाईलमध्ये ठेवू शकता. यानंतर तुमच्या मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचं प्रमाण अतिशय कमी होतं. तुम्हाला आजारांपासून दूर राहायचं असल्यास ही चिप अतिशय प्रभावी ठरेल" असं कथिरिया यांनी सांगितलं आहे. या चिपला गौसत्व कवच असं नाव देण्यात आलं असून त्याची निर्मिती राजकोटमधील श्रीजी गौशाळेकडून केली जाते. राष्ट्रीय कामधेनू आयोग केंद्रीय मत्सोत्पादन, पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.
गेल्या वर्षी 6 फेब्रुवारीला आयोगाची स्थापना करण्यात आली. गाय आणि गोवंश संरक्षण, संवर्धन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कामधेनू आयोग स्थापन करण्यात आला. याबद्दलची घोषणा 2019-20 साठीच्या अर्थसंकल्पात केली गेली. कथिरिया यांनी अभिनेता अक्षय कुमारनं काही दिवसांपूर्वी गोमूत्राबद्दल केलेल्या विधानाकडे लक्ष वेधलं होतं. 'मी दररोज गोमूत्र प्राशन करतो, असं अक्षय कुमारनं म्हटलं होतं, हे कदाचित तुम्हाला आठवत असेल. वैद्यकीय कारणांमुळे गोमूत्र प्राशन करत असल्याचं अक्षय म्हणाला होता,' असं कथिरिया यांनी सांगितलं. आयुर्वेदिक औषधांचे विविध फायदे आहेत. मात्र आपण ते विसरले आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.