तिरुअनंतपूरम- केरळमध्ये एका माजी रेडिओ जॉकीची स्टुडिओत घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेश उर्फ रसिकन राजेश असं हत्या झालेल्या 36 वर्षीय आरजेचं नाव आहे. या घटनेत आणखी एक व्यक्ती जखमी झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रसिकन राजेश हा रेडिओ जॉकीसह लोकगायकही होता.
राजेश आणि त्याचा मित्र कुत्तन स्टेज शोनंतर स्टुडिओमध्ये परतले. स्टुडिओमध्ये सामान ठेवत असताना लाल रंगाच्या स्वीफ्ट कारमधून अज्ञात व्यक्ती बाहेर आल्या आणि त्यांनी धारदार शस्त्राने राजेश आणि त्याच्या मित्रावर हल्ला केला. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने लगेचच राजेश आणि त्याच्या मित्रांला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण, उपचारादरम्यानच राजेशचा मृत्यू झाला. त्याचा मित्र कुत्तन याच्यावर तिरुवअनंतपुरम वैद्यकिय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. केरळ पोलीस ठाण्याच्या पल्लिकल हद्दीत येणाऱ्या मदवूर भागात हा स्टुडिओ आहे.
राजेशने आधी रेड एफएममध्ये आरे म्हणून काही वर्षांसाठी काम केलं आहे. त्यानंतर त्याने व्हॉइस ऑफ केरळसाठीही काम केलं आहे. राजेश नुकतान मिमिक्रीचं शिक्षण घेऊन परदेशातून परतला होता. राजेशच्या मागे त्याची पत्नी व मुलगा असं कुटुंब आहे.