मुंबई - बॉलिवूड अभिनेता आणि लॉकडाऊनचा सुपरहिरो सोन सूदच्या घरासह विविध ठिकाणच्या कार्यालयावर आयटी विभागाने धाडी टाकल्या आहेत. दोन दिवसांपासून प्राप्तीकर विभागाकडून सोनूची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यावरुन, आता शिवसेनेनं केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे, हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हटले आहे.
भारतीय जनता पक्ष हा जगभरात सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. मोठ्या राजकीय पक्षाचे मनही मोठे असायला हवे. विरोधी पक्षांची राज्याराज्यांतील सरकारे असतील किंवा वेगळ्या विचारांचे लोक असतील, त्या विरोधी विचारांचा आदर राखण्यातच राज्यकर्त्यांचे मोठेपण आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, राज्यपालांनी वरच्या दबावामुळे 12 आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे, हे रडीचे डाव आहेत, अशा शब्दात शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. सोनू सूद यांच्यावरील कारवाई ही हेतूपरस्पर असल्याचा आरोपच त्यांनी केलाय.
केजरीवाल सरकारचा ब्रँड अम्बेसिडर होताच धाडी
सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱयांत भाजप पुढे होता. सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते, पण या सोनू महाशयांनी दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे 'ब्रॅण्ड ऍम्बेसेडर' म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत.
दुसऱ्यादिवशीही आयटीची धाड
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबई व लखनौतील कार्यालय व घराची आयकर विभागाकडून गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी झडती घेण्यात आली. बुधवारी २० तास तपासणी केल्यानंतर ‘आयटी’चे पथक गुरुवारी सकाळी पुन्हा त्यांच्या जुहू येथील कार्यालय व लोखंडवाला येथील घरी पोहोचले. मात्र, तपासणीबद्दल त्यांच्याकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
20 तास कसून चौकशी
विविध सामाजिक कार्यासाठी केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे स्रोत जाणण्यासाठी संबंधित कागदपत्रे व दस्तावेजाची छाननी केली जात असल्याचे समजते. आयकर विभागाच्या सहा स्वतंत्र पथकाकडून बुधवारी सकाळपासून कारवाईला प्रारंभ करण्यात आला. लोखंडवाला येथील सहाव्या मजल्यावरील निवासस्थान, जुहूतील कार्यालय व हॉटेल तसेच लखनौमधील कार्यालयात पोहचून तपासणी सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून विविध बँक खाती, त्यावरील व्यवहार व दस्तावेजाची तपासणी करण्यात आली. २० तासानंतर पथक परतले होते. यावेळी सोनू सूद व त्याचे कुटुंबीय ओशिवरा येथील घरी उपस्थित होते.