उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील खीरों पोलीस स्टेशन परिसरातील रघुराज सिंह रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना टळली आहे. रेल्वे रुळांवर मातीचा ढिगारा पाहून पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलटने ट्रेन थांबवली. रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. रायबरेली-रघुराज सिंह पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलटला मातीचा ढिगारा दिसला. त्यामुळे इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवण्यात आली. ट्रेन रुळावरून घसरण्यापासून वाचली. सुमारे २० मिनिटांनी ट्रेन पुन्हा रवाना करण्यात आली.
रघुराज सिंह रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला, रेल्वे फाटक आहे. या प्रकरणी खीरों पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक देवेंद्र भदोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपरमधून काही माती रेल्वे रुळावर पडली होती. जी काढण्यात आली आहे. माती हटवल्यानंतर रेल्वेची वाहतूक सुरू झाली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
रुळावर माती टाकून डंपर चालक फरार
रस्त्याचं काम सुरू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. यामध्ये रात्री डंपरमधून माती वाहून नेण्याचं काम केलं जातं. रविवारी उशिरा एक चालक डंपरमधून माती घेऊन जात असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. रात्री आठच्या सुमारास अचानक त्याने रेल्वे रुळावर माती टाकली आणि डंपरसह पळ काढला. काही वेळाने रायबरेली ते रघुराज सिंह स्थानकादरम्यान धावणारी शटल ट्रेन आली. पण लोको पायलटला रेल्वे रुळावर मातीचा ढिग दिसला आणि त्याने ट्रेन थांबवली. स्टेशन काही अंतरावर असल्याने ट्रेनचा वेगही कमी होता. लोको पायलटच्या हुशारीमुळे मोठी दुर्घटना टळली.
मोठी रेल्वे दुर्घटना टळली
लोको पायलटच्या प्रसंगावधनामुळे मोठी रेल्वे दुर्घटना टळल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. ट्रॅकवरून मातीचा ढीग काढण्यात आला आहे. यानंतर गाड्यांची वाहतूक सुरू झाली आहे. गेटमन सांगतो की, ट्रेन रघुराज सिंह स्टेशनजवळ आली होती. त्यामुळे वेग कमी होता. वेग जास्त असता तर ट्रेन रुळावरून घसरली असती. सध्या पोलीस डंपर चालकाचा शोध घेत आहेत.