राफेल करार : अरुण जेटलींची राहुल गांधीवर घणाघाती टीका, प्रणव मुखर्जींकडून शिकण्याचा दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 11:33 PM2018-02-08T23:33:43+5:302018-02-08T23:35:41+5:30
राफेल करारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप अधिकाधिक तीव्र होऊ लागले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केल्यानंतर भाजपाने राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नवी दिल्ली - राफेल करारावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप अधिकाधिक तीव्र होऊ लागले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केल्यानंतर भाजपाने राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी संरक्षण मंत्रालयाने पत्रक प्रसिद्ध केल्यानंतर आज वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला. अशा प्रकारचे आरोप करून तुम्ही देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवत आहात. याबाबत राहुल गांधी यांनी माजी संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जींच्या आचरणातून काही शिकण्याची गजर आहे, असा टोलाही जेटली यांनी लगावला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर टीका करताना, मोदी यांनी आधी राफेल लढाऊ विमानांच्या किंमती जाहीर करा, अशी मागणी केली होती. मोदी लोकसभेत तब्बल दीड तास बोलत होते. पण संपूर्ण भाषणात त्यांनी राफेल विमाने भारताने केवढ्याला विकत घेतली, याचे उत्तर दिले नाही. देशातील शेतकºयांच्या स्थितीवर त्यांनी शब्द उच्चारला नाही आणि तरुणांना रोजगार देण्याच्या आश्वासनाबद्दलही ते काहीच बोलले नाही.
काँग्रेसने देशाची फाळणी केली, या मोदी यांच्या आरोपाला उत्तर देताना राहुल म्हणाले की, आज देशात केवळ काँग्रेस व जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच लोकशाही टिकून आहे, हे लक्षात ठेवावे. पंतप्रधानांनी वाटल्यास इतिहास बारकाईने वाचावा. राफेल विमानांची किंमत विचारताच संरक्षणमंत्री गुप्ततेचे कारण सांगतात, देशहिताचा विषय काढतात. राफेर विमानांच्या किंमती गुप्त ठेवण्याचे कारणच काय?