नवी दिल्ली - भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल विमान करारावरून भारतात केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांनी आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडवला आहे. मात्र दुसरीकडे फ्रान्समध्ये भारताला देण्यात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. राफेल लढाऊ विमानांची फ्रान्समधील इस्तरे ली ट्यूब हवाई तळावरील चित्रफित समोर आली आहे. राफेल विमाने हवाई दलाच्या ताफ्यात आल्यावर भारताच्या हवाई दलाची क्षमता वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राफेल लढाऊ विमानांमध्ये असलेल्या अनेक वैशिष्ट्यांमुळे ही विमाने अन्य लढाऊ विमानांपेक्षा वेगळी ठरतात. दोन इंजिन असलेले हे विमान ताशी दोन हजार 130 किमी वेगाने उड्डाण करू शकते. तसेच या विमानांमधून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा मारा करता येऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राफेल विमाने दूरच्या अंतरावरील लक्ष्यही सहजपणे भेदू शकतात. राफेल लढाऊ विमाने सुमारे 24 हजार 500 किलो वजन आपल्यासोबत वाहून नेण्यास सक्षम आहेत. तसेच अण्वस्त्र वाहून नेण्यातही सक्षम आहेत.
Rafael Deal : अशी आहेत भारताने फ्रान्सकडून खरेदी केलेली राफेल विमाने
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 11:45 AM