नवी दिल्ली : ३६ राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारामध्ये कोणताही घोटाळा न झाल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला क्लीन चिट दिली होती. पण १४ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारी एक याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी तसेच अॅड. प्रशांत भूषण यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.राफेल व्यवहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या सर्व जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. राफेल विमानांची खरेदी देशासाठी आवश्यक असल्याचे न्यायालयाने या निकालात म्हटले आहे. राफेलच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेससह काही विरोधी पक्ष सरसावले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत तो प्रचारातील मुख्य मुद्दा बनविण्याचाही या पक्षांचा विचार होता. मात्र, या निकालामुळे या पक्षांची मोठी राजकीय अडचण झाली. सिन्हा, शौरी, भूषण यांनी केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, राफेलच्या खरेदीत अनेक उणिवा आहेत. केंद्र सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा. या याचिकेची खुली सुनावणी व्हावी, असेही या तिघांनी म्हटले आहे.मोदी यांच्यावर आरोपकाँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, राफेल व्यवहार करताना अनेक नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. त्यांची नोंद ज्या फायलींमध्ये आहे त्या माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या ताब्यात आहेत. या फायली लपवून का ठेवण्यात येत आहेत, असाही सवाल त्यांनी केला.राफेलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच थेट आरोप झाले आहेत. मात्र, त्याचा इन्कार मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत करून मोदी पुन्हा एकदा खोटे बोलले आहेत.
राफेल : सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका; सरकारकडून खोटी माहिती दिल्याचा शौरी, भूषण, सिन्हा यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 4:54 AM