नवी दिल्ली : राफेल प्रश्नावरून विरोधी पक्षांनी पुन्हा प्रचंड गदारोळ घातल्याने मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. तामिळनाडूतील द्रमुक, अण्णाद्रमुकच्या खासदारांनीही कावेरी जलवाटप तंट्याच्या मुद्यावरून केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या, तर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी तेलगू देसम पक्षाने लावून धरली.
शांततेत सभागृहाचे कामकाज पार पाडावे, असे आवाहन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी वारंवार करूनही काँग्रेसचे सदस्य वेलमध्ये गोळा झाले. राफेलप्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा, अशा मागणीचे फलक उंचावत त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. या गदारोळात नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ डिझाईनसंदर्भातील दुुरुस्ती विधेयक सभागृहात मांडण्यात आले.शेतीमालाच्या वाढलेल्या किमती, वादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांतील बिकट स्थिती यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सभागृहात विनाअडथळा चर्चा होऊ द्यावी, असे आवाहन राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांना केले होते. अण्णाद्रमुक, द्रमुकच्या खासदारांनी कावेरी जलवाटप तंट्यावरून गदारोळ माजविला. राहुल गांधींवर दाखल केलेला हक्कभंग प्रस्ताव चर्चेसाठी घ्यावा, अशी मागणी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केली; पण गोंधळ वाढल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजता तहकूब करण्यात आले.राहुल यांनी माफी मागावी : भाजपालोकसभेमध्येही विरोधकांकडून येणाऱ्या अडथळ्यांमुळे सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा सभागृहात गोंधळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्याचा निर्णय अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी घेतला. राफेलप्रकरणी खोटारडी वक्तव्ये करणाºया राहुल गांधींनी माफी मागावी, अशा घोषणा भाजपा खासदारांनीही दिल्या.