नवी दिल्ली - राफेल विमानांच्या खरेदीसाठी करण्यात आलेला करार हा सरकारने घेतलेला धाडसी निर्णय असून, राफेल विमाने आणि एस-400 एअर डिफेन्स प्रणाली भारतीय सुरक्षा व्यवस्थे बुस्टर डोस ठरणार असल्याचे मत, हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी मांडले आहे. एकीकडे राफेल विमानांवरून देशात राजकीय वाद पेटला असतानाच हवाई दलप्रमुखांनी फ्रेंच कंपनी दसॉ एव्हिएशनसोबत झालेल्या कराराला योग्य ठरवले आहे. राफेल करारामधून आम्हाला अनेक फायदे मिळणार असल्याचे हवाई दलप्रमुखांनी म्हटले आहे.
यावेळी हवाई दलाती घटत असलेल्या स्क्वॉड्रनच्या संख्येबाबतही हवाई दलप्रमुखांनी चिंता व्यक्त केली. तसेच हिंदुस्थान एअरोनॉटिक्ससोबत करार करूनही डिलिव्हरीमध्ये होत असलेल्या उशिरावर बोट ठेवले. "सुखोई विमानांच्या डिलिव्हरीमध्ये तीन वर्षे उशीर झाला. जग्वार या लढाऊ विमानाच्या डिलिव्हरीसाठी सहा वर्षे उशीर झालाय. एलसीएच्या डिलिव्हरीसाठी पाच वर्षे आणि मिराज 2000च्या डिलिव्हरीमध्ये दोन वर्षे उशीर झाला आहे," अशी माहिती हवाई दलप्रमुखांनी दिली.