नवी दिल्ली - चीनच्या सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन भारतीय दलाने केलेली खास विनंती मान्य करून फ्रान्सने राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीत 5 विमानांची पाठवणी केली आहे. बहुप्रतिक्षीत असलेल्या या राफेल विमानांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राफेल विमानांच्या गगनभरारीचा अफलातून व्हिडिओ शेअर केला आहे.
भारतात अंबाला विमानतळावर काही वेळातच राफेल विमानं दाखल होणार आहेत. फ्रान्सकडून पहिल्या टप्प्यात 5 राफेल विमानं भारताला देण्यात आली असून या 5 राफेलसह 2 SU30 MKIs विमान आहेत. त्यामुळे, एकूण 7 लढाऊ विमानांच काही वेळातचं विमानतळावर आगमन होईल. मात्र, हा व्हिडिओ पाहून शेअर करण्याचा मोह आवरणार नाही. राफेल विमानांमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेष म्हणजे भारतात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. अंबाला एअरफोर्स स्टेशनवर भारतीय हवाई दलाची ही नवीन राफेल लढाऊ विमानं तैनात केली जाणार आहेत. राफेलसारख्या प्राणघातक आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांना तैनात करण्यासाठी केवळ अंबालाच का निवडले गेले. कारण अंबाला अशी जागा आहे जिथून आपल्या देशातील दोन्ही शत्रूंना काही मिनिटांत धुळीस मिळवता येऊ शकते.
राजनाथसिंह यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.