नवी दिल्ली - संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून बुधवारी लोकसभा सभागृहात राफेल करारावरुन राहुल गांधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. संसदेत राहुल यांनी राफेल करारावरुन अनेक प्रश्न विचारले. मात्र, त्यानंतरही राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींना लक्ष्य करत 4 प्रश्न विचारले आहेत. पण, हे प्रश्न विचारताना राहुल यांच्याकडून गलती से मिस्टेक झाल्याचं पाहायला मिळालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी राफेल विमान खरेदीबाबत मी विचारत असलेल्या प्रश्नांची लोकसभेत येऊ न उत्तरे द्यावीत, असे माझे त्यांना आव्हान आहे, पण त्यांच्यात ती हिंमतच नाही, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्रच सोडले.
हवाई दलाला 126 विमाने हवी असताना केवळ 36 विमानांचाच सौदा का केला? विमानांची संख्या कमी का केली? एकूण 526 कोटी रुपयांचा हा व्यवहार 1600 कोटी रुपयांवर का गेला? हिंदुस्थान एरोनॉटिक्स या सरकारी व अनुभवी कंपनीऐवजी अनिल अंबानी यांच्या अनुभव नसलेल्या कंपनीला ऑफसेट कंत्राट देण्यास नेमका कोणाला रस होता? असे तीन प्रश्न राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विचारले होते. मात्र, ट्विटवरुन लिहताना राहुल यांनी प्रश्न क्रमांक 2 नंतर थेट 4 च विचारला. त्यामुळे राहुल यांच्याकडून तिसरा प्रश्न गाळल्याचे दिसले. मात्र, याबाबत राहुल यांनी जवळपास तीन तासानंतर पुन्हा ट्विटवरुन तिसरा प्रश्न विचारला आहे. विशेष म्हणजे, The Missing Q3 असे म्हणत राहुल यांनी तिसरा प्रश्न विचारला.
लोकसभा अध्यक्षांच्या सुचनेनुसार मी तिसरा प्रश्न पाठिमागे ठेवला होता. मात्र, राफेल करारासंदर्भात तो प्रश्न अतिशय महत्त्वाचा असल्यानं मी पुन्हा तो प्रश्न विचारत असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. प्रश्न क्र.3 - राफेल करारासंदर्भातील फाईल्स पर्रीकरजींनी आपल्या बेडरुममध्ये का ठेवल्या, कृपया मोदीजींनी याचं उत्तर द्याव ? असा तिसरा प्रश्न राहुल यांनी विचारला आहे. मात्र, राहुल यांची ही 'गलती से मिस्टेक' झाल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
संसदेच्या समितीने चौकशी केली, तरच या प्रकरणातील भ्रष्टाचार उघड होईल, असे सांगून राहुल गांधी यांनी इथे डाळीत काळेबेरे नसून, सारी डाळच काळी असल्याचा टोला मोदी यांना लगावला. सरकारने 1500 कोटी रुपयांचा व्यवहार करण्याचे ठरविले, तेव्हा संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता, हे खरे नाही काय आणि पंतप्रधानांनी अशा व्यवहारात लक्ष घालू नये, असे नोटिंग या अधिकाऱ्यांनी फायलीवर केले होते, हे खरे नाही की काय, असे सवालही राहुल गांधी यांनी केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या व्यवहारात गैरव्यवहार झालेला नाही, असे नमूद केले असल्याने या प्रकरणाची संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याचे कारण नाही, असे सांगून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहहुल गांधी यांची मागणी फेटाळून लावली.
राफेलविषयीच्या फायली आपल्या घरी असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपणास सांगितल्याचे तेथील आरोग्यमंत्री विश्वजीत राणे अन्य एकाला सांगत असल्याची ध्वनिफित काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लोकसभेतील चर्चेआधीच पत्रकार परिषदेत सर्वांना ऐकवली होती. त्याचा उल्लेख करून, ती ध्वनिफित ऐकवण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला. पण त्यास लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी परवानगी नाकारली.