Rafale Deal: काँग्रेस विरोधातील 5000 कोटींचा मानहानीचा दावा अनिल अंबानी मागे घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 08:59 PM2019-05-21T20:59:59+5:302019-05-21T21:07:38+5:30
निवडणूक प्रचार संपल्यानंतर मानहानीचा दावा रिलायन्सकडून मागे
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातलं मतदान संपल्यानंतर, एक्झिट पोल्सचे आकडे आल्यावर उद्योगपती अनिल अंबानींनी मोठा निर्णय घेतला आहे. राफेल डीलवरुनकाँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपांनंतर दाखल करण्यात आलेला मानहानीचा दावा अनिल अंबानींकडून मागे घेण्यात येणार आहे. काँग्रेस नेते आणि नॅशनल हॅरॉल्डविरोधात दाखल करण्यात आलेला 5 हजार कोटींचा मानहानीचा दावा मागे घेण्याचा निर्णय अंबानींनी घेतला आहे. अहमदाबाद न्यायालयात अंबानींनी या प्रकरणी खटला दाखल केला होता.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि त्याआधीही काँग्रेसनं राफेल डीलचा मुद्दा उपस्थित केला होता. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याची माहिती रिलायन्स समूहाचे वकील रशेष पारिख यांनी दिली. याबद्दल समूहानं घेतलेल्या निर्णयाची माहिती नॅशनल हेरॉल्डच्या वकिलांना देण्यात आल्याचं पारिख यांनी सांगितलं. रिलायन्स समूहानं मानहानीचा खटला मागे घेण्याचा निर्णय घेतल्याच्या माहितीला नॅशनल हेरॉल्डचे वकील पी. एस. चंपानेरी यांनी दुजोरा दिला.
खटला मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर सुरू होईल, अशी माहिती चंपानेरी यांनी दिली. नॅशनल हेरॉल्डनं राफेल विमान खरेदी प्रकरणी एक लेख प्रसिद्ध केला होता. विश्वदीपक नावाच्या पत्रकारानं हा लेख लिहिला होता. यानंतर रिलायन्सनं विश्वदीपक आणि नॅशनल हेरॉल्डचे संपादक जफर आगा यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.