अमेठी - अमेठीच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डीलवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. सोमवारी (24 सप्टेंबर) एका कार्यक्रमांतर्गत सोशल मीडिया वॉलिंटिअर्ससोबत संवाद साधताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ''आता तर फक्त सुरुवात झालीय, पुढे पाहा आणखी मजा येणार आहे. येणाऱ्या दोन-तीन महिन्यांमध्ये आम्ही तुम्हाला आणखी गंमत दाखवू. नरेंद्र मोदींची जी कामं आहेत... राफेल, ललित मोदी, विजय माल्या, नोटाबंदी, गब्बर सिंग टॅक्स या सर्वांमध्ये चोरीची कृती आहे. एक-एक प्रकरण बाहेर काढून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की हे नरेंद्र मोदी चौकीदार नाहीत, तर ते चोर आहेत''.
(राफेल विमान चालवून भारताचे एअर मार्शल खूश; मोदी सरकारचा करार दमदार असल्याचा दावा)
पुढे ते असंही म्हणाले की, चौकीदार जी (नरेंद्र मोदी) पंतप्रधान बनले, थेट फ्रान्समध्ये गेले आणि तेथील राष्ट्रपतींसोबत करार केला. HAL सोडून अनिल अंबानींना करार द्यावा, असेही त्यांनी म्हटले होते. पण 526 कोटी रुपयांच्या विमानाची 1600 कोटी रुपयांमध्ये खरेदी का करण्यात आली?, हे देखील जाणून घ्यायचे असल्याचं यावेळी राहुल गांधी म्हणाले.
''पंतप्रधान मोदींसोबत राफेल डीलसंदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते डोळ्यात-डोळे घालून बोलू शकले नाहीत. देशाचा चौकीदार प्रत्येक विषयावर भाषण देऊ शकतो, पण राफेल डीलसंदर्भात कधही भाषण देऊ शकत नाहीत'',अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढवला आहे.