Rafale Deal : 'राणेंची ती ऑडिओ क्लिप खरी, म्हणूनच FIR झाला नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 02:54 PM2019-01-28T14:54:18+5:302019-01-28T15:02:22+5:30
Rafale Deal : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा मोदी सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा मोदी सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गोवा सरकारमधील मंत्री विश्वजीत राणे यांची राफेल करारासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिप महिन्याभरापूर्वी काँग्रेसनं ट्विटवर पोस्ट केली होती.
यासंदर्भात राहुल गांधी यांनी सोमवारी(28 जानेवारी) रिट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ''विश्वजीत राणे यांची ऑडिओ क्लिप खरी असून मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल करारासंदर्भातील सर्व गोपनीय माहिती आहे. ही ऑडिओ क्लिप समोर येऊन 30 दिवस झालेत. मात्र याविरोधात अद्यापपर्यंत FIR ही नोंदवली गेली नाही किंवा चौकशीदेखील करण्यात आली नाही.
30 days since the Goa Audio Tapes on RAFALE were released. No FIR or enquiry ordered. No action against the Minister either!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 28, 2019
It's obvious that the tapes are authentic & that Goa CM, Parrikar, is in possession of explosive RAFALE secrets, that give him power over the PM. https://t.co/sKwwfIj0bM
नेमके काय आहे प्रकरण?
राफेल विमान करारवरुन काँग्रेसनं भाजपावर 2 जानेवारी रोजी 'ऑडिओ बॉम्ब' टाकला होता. राफेल डीलसंदर्भातील गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची कथित ऑडिओ क्लिप काँग्रेसकडून जारीकरण्यात आली होती. या क्लिपमुळे राफेल डील प्रकरणाला वेगळेच वळण प्राप्त झाले. गोव्याच्या कॅबिनेटमध्ये राफेल खरेदी करारासंदर्भात झालेल्या चर्चेचा हवाला देत काँग्रेसनं गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासहीत मोदी सरकारवर निशाणा साधला. कथित ऑडिओ क्लिपमध्ये राणेंनी म्हटलं की,''राफेलसंदर्भातील सर्व माहिती माझ्या बेडरुममध्ये आहेत. त्यामुळे माझं कोणीही वाकडं करू शकत नाही, असे मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.''
यावरुनच काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवरही पुन्हा निशाणा साधला. पर्रीकरांकडे राफेलची सर्व रहस्यं असल्यानंच मोदी त्यांना घाबरत आहेत का? , असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला. तसंच राफेलच्या सर्व फाईल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये कशा आल्या आणि का आहेत?, अशी विचारणादेखील काँग्रेसनं केली.
विश्वजित राणेंचं स्पष्टीकरण
दरम्यान, काँग्रेसनं जारी केलेली ऑडिओ क्लिप माझी नसल्याचे सांगत राणे यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. ''क्लिपमधील संभाषण काँग्रेसकडून चुकीच्या पद्धतीनं समोर आणण्यात आले आहे. या क्लिपची लॅबटेस्ट करावी'',अशी मागणीही राणे यांनी केली होती. काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही राणे यांनी केला. शिवाय, काँग्रेसनं इतक्या खालच्या स्तरावरचं राजकारण करू नये, जेणेकरुन कॅबिनेट आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गैरसमज निर्माण होतील. तसंच मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राफेल डील किंवा यासंदर्भातील कागदपत्रांबाबत कधीही कोणतेही विधान केले नव्हते, असे स्पष्टीकरणही राणे यांनी दिले होते.