नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राफेल कराराबाबत काहीही चुकीचे सांगितले नाही. राफेलची किंमत ठरविणे हे न्यायालयाचे काम नाही. तसेच, राम मंदिराचा निर्णय घेणेही न्यायालयाचे काम नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सांगितले.
आज सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला दिलासा दिला आहे. राफेल कराराच्या विरोधात दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. याप्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नाहीत. सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. सरकार खरेदी करत असलेल्या 126 विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. या प्रकरणातील प्रत्येक बारकाव्याची पडताळणी करणे सर्वोच्च न्यायालयाला शक्य नाही, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाने काहीही चुकीचे सांगितले नाही, किंमत ठरविणे हे न्यायालयाचे काम नाही. तसेच राम मंदिराचा निर्णय घेणेही न्यायालयाचे काम नाही. राफेल विमान कराराचा मुद्दा संसदेत सोडविला जाऊ शकतो. परंतू, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सोडविला जाऊ शकत नाही'.
काय आहेत काँग्रेसचे आरोप?राफेल विमानांच्या खरेदीसाठी यूपीए सरकारनं जो करार केला होता, त्यापेक्षा तिप्पट रक्कम मोजून मोदी सरकारनं करार केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. यूपीए सरकारनं एकूण 126 विमानांसाठी हा करार केला होता. यातील फक्त 18 विमानं फ्रान्समध्ये तयार करुन ती भारतीय हवाई दलाकडे सोपवण्यात येणार होती. उर्वरित विमानांची निर्मिती डसॉल्ट कंपनी (राफेल निर्मिती करणारी कंपनी) भारतात हिंदुस्तान ऍरॉनॉटिक्स लिमिटेडच्या मदतीनं करणार होती. मात्र मोदी सरकारनं हिंदुस्तान ऍरॉनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीला डावलून अनिल अंबानींच्या रिलायन्सला कंत्राट दिलं. विशेष म्हणजे हिंदुस्तान ऍरॉनॉटिक्स लिमिटेडकडे संरक्षण क्षेत्रात काम करण्याचा 78 वर्षांचा अनुभव आहे. तर रिलायन्सकडे असा कोणताही अनुभव नाही. काँग्रेसनं याच मुद्यांवर आतापर्यंत देशभरात 100 हून अधिक पत्रकार परिषदा घेत मोदी सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत.
राहुल गांधींनी पुन्हा असा बालिशपणा करू नये- अमित शाहसर्वोच्च न्यायालयाने राफेल करारावरून मोदी सरकारला क्लीन चिट दिल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाहांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी राफेलच्या मुद्द्यावरून देशाची दिशाभूल केली आहे. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून सत्याचा विजय झाला आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेसला फायदा पोहोचवण्यासाठीच राफेलवरून राजकारण केल्याचा आरोपही भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी केला आहे. असत्य निराधार असते. त्यामुळेच नेहमी सत्याचा विजय होतो. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच राहुल गांधींनी आता तरी बालिशपणा सोडावा, असेही ते म्हणाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेसचं पितळ पाडले उघडे- देवेंद्र फडणवीससर्वोच्च न्यायालयाने राफेल करारात कोणताही घोटाळा झाला नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच राफेल कराराची सीबीआय चौकशींची मागणी करणाऱ्या याचिकाही फेटाळून लावल्या आहेत त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेसचे पितळ उघडकीस आणले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत. जागतिक स्तरावर देशाचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींनी आता माफी मागावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.