Rafale Deal : नरेंद्र मोदींनी सर्वोच्च न्यायालयात कबूल केली चोरी, राहुल गांधींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 01:33 PM2018-11-13T13:33:40+5:302018-11-13T14:47:32+5:30
राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे.
नवी दिल्ली - राफेल विमान करारप्रकरणी केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर शपथपत्राद्वारे माहिती सादर केली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप करताना नरेंद्र मोदींनीसर्वोच्च न्यायालयात चोरी कबूल केली, असे म्हटले आहे. तसेच राफेल विमान करारप्रकरणी ''पिक्चर अभी बाकी है'' असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून राफेल विमान करारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निषाणा साधला आहे."सर्वोच्च न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली चोरी कबूल केली आहे. ''सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात हवाई दलाला न विचारता करारात बदल करण्यात आल्याचे तसेच 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात घातल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे.''असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
सुप्रीम कोर्ट में मोदीजी ने मानी अपनी चोरी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 13, 2018
हलफ़नामे में माना कि उन्होंने बिना वायुसेना से पूछे कांट्रैक्ट बदला और 30,000 करोड़ रूपया अंबानी की जेब में डाला।
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...https://t.co/flCgrrlUjw
फ्रान्सच्या दस्सॉल्ट कंपनीकडून घ्यायच्या ३६ राफेल लढाऊ विमानांच्या किंमतीची माहिती देण्यास कुरकुर करणाऱ्या केंद्र सरकारने फक्त न्यायाधीशांना पाहण्यासाठी का होईना, पण ती सीलबंद लखोट्यात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. या विमानखरेदीच्या निर्णय प्रक्रियेसह किंमतीची माहितीही द्यावी, असा आदेश न्यायालयाने ३१ ऑक्टोबर रोजी दिला, तेव्हा अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी किमतीची माहिती गोपनीय असल्याने ती उघड करण्यास विरोध केला होता. परंतु सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आदेशात बदल न करता त्यांना सांगितले की, तर तसे प्रतिज्ञापत्र करा. आम्ही त्याचा विचार करू. त्यानंतर न्यायालयाचा रोष टाळण्यासाठी केंद्राने आज ती सादर केली.
दरम्यान, रिलायन्सशी झालेल्या ऑफसेट कराराबाबत दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही अनिल अंबानींच्या कंपनीत नव्हे, तर जॉईंट व्हेंचरमध्ये गुंतवणूक केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. विमान निर्मितीचा कोणताही अनुभव नसताना, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादामुळे रिलायन्सला राफेल विमानाचं कंत्राट मिळाले, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनेकदा केला आहे.