नवी दिल्ली : फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनी वक्तव्य केले, की राफेल करारासाठी अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या निवडीमध्ये फ्रान्सचा कोणताही हात नाही. अनिल अंबानी यांचे नाव नरेंद्र मोदी यांनी पुढे केले होते. हे खरे आहे की खोटे, याचे स्पष्टीकरण मोदी यांनी द्यावे. देशाचा चौकीदारच चोर निघाला, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
अनिल अंबानी यांच्या कंपनीला एकही विमान बनविण्याचा अनुभव नाही. एचएएलला 70 वर्षांचा अनुभव आहे. ओलांद यांनी थेट आपल्या देशाचा आणि कंपनीचा अंबानींना निवडण्यात काहीही हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ मोदी यांनीच अंबानींचे नाव सुचविले होते. मोदी यावर एकही शब्द का बोलत नाहीत. भारताच्या जवानांच्या आयुष्याचा, देशाच्या सुरक्षेचा आणि भ्रष्टाचाराचा हा प्रश्न आहे. मोदी यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
मोदी यांनी त्यांचे जवळचे मित्र अनिल अंबानी यांना 30 हजार कोटींची भेट दिलीय. मोदी यांची आपण मदतच करत असून, फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनी केलेले आरोप खोटे आहेत, हे मोदी यांनी सांगावे आणि खरे देशासमोर मांडावे. राफेल घोटाळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून देशाचा चौकीदारच चोर निघाल्याचा गंभीर आरोप त्यांनी मोदी यांच्यावर लावला.
देशाच्या संरक्षण मंत्री असंबद्ध वक्तव्ये करत आहेत. पहिल्यांदा त्यांनी सांगितले की, राफेल करार बदलल्याचे माहित नव्हते. नंतर सांगतात की, करार बदलला. विमानाची किंमत जाहीर करू. मग काही दिवसांनी देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने किंमत जाहीर करू शकत नाही. हा करार सितारामन, जेटली आणि राजनाथ सिंह यांनी केला नसून तो मोदी यांनी स्वत: केलेला आहे. मात्र, हे तिघे मोदींना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही राहुल यांनी केला.
तिप्पटीने किंमती वाढविल्यायुपीएने 534 कोटींना राफेल विमान खरेदी केले होते. मोदींनी ते 1600 कोटी रुपयांना घेतले आहे. अंबानींनी बैठकीच्या 12 दिवस आधी कंपनी बनविली. एचएएलला 70 वर्षांचा अनुभव आहे. अंबानींच्या कंपनीला काहीच अनुभव नाही. तरीही हे कंत्राट अंबानींना कसे दिले? हा ही एक मोठा भ्रष्टाचारच असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.