नवी दिल्ली - राफेल डीलवरुन सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डीलवरुन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. राफेल डीलसंदर्भात संरक्षणमंत्री खोटं बोलत आहेत, पण माझ्या प्रश्नांना त्या कोणतेही उत्तरं देत नाहीयेत, असा आरोप राहुल गांधी यांनी मंगळवारी (8 जानेवारी) केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत संरक्षणमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
''राफेल लढाऊ विमानाच्या पुरवठ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दसॉल्ट कंपनीला 20 हजार कोटी रुपये दिले. पण हिंदुस्थान एरोनॉटिक्सला (HAL) थकीत 15,700 कोटी रुपये देण्यास नकार दिला. यामुळे हिंदुस्थान एरोनॉटिक्सला कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागले'', असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
दरम्यान, 'संरक्षणमंत्र्यांनी खोटं बोलण्याचा धडका लावला आहे. पण माझ्या प्रश्नांना उत्तरं काही मिळेनात', असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे.
(उद्या संसदेत पुरावे आणा अन्यथा राजीनामा द्या; राहुल गांधींचं संरक्षणमंत्र्यांना आव्हान)
(राहुल गांधी करताहेत देशाची दिशाभूल, HALवरून निर्मला सीतारमन यांचे प्रत्युत्तर)हिंदुस्थान एरोनॉटिक्स (HAL)सोबत करण्यात आलेल्या कराराच्या मुद्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला होता. यासंदर्भातील माहिती सोमवारी (7 जानेवारी) ट्विटरवर पोस्ट करत राहुल गांधींनी हा गंभीर आरोप केला होता.
राफेल डीलवर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा टार्गेटदेखील केले. ''पंतप्रधान मोदी लोकसभेत येण्यास घाबरत आहेत. त्यांनी राफेल डील प्रकरणावर 15 मिनिटे चर्चा करावी'', असे आव्हान राहुल गांधींनी दिले होते.
दरम्यान,''जेव्हा नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान खरेदीसाठी करार केला. त्यावेळेस संरक्षण मंत्रालय तसंच वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांनी केलेल्या हस्तक्षेपावरआक्षेप घेतला होता की नाही?'', असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, हिंदुस्थान ऍरोनॉटिक्स लिमिटेडला एक लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स दिल्याची खोटी माहिती सीतारामन यांनी दिली, असा दावा काँग्रेसनं केला आहे. संसदेत येताना याबद्दलची कागदपत्रं घेऊन या. अन्यथा राजीनामा द्या, असं थेट आव्हान सोमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सीतारामन यांना दिलं आहे.
हिंदुस्थान ऍरोनॉटिक्स लिमिटेडला एक लाख कोटी रुपयांच्या ऑर्डर्स दिल्याचा आदेश दिल्याची माहिती सीतारामन यांनी राफेल डीलबद्दल बोलताना दिली. मात्र ही माहिती पूर्णपणे खोटी आहे. आपल्याला एक पैसादेखील मिळाला नसल्याचं हिंदुस्थान ऍरोनॉटिक्स लिमिटेडनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सीतारामन यांनी याबद्दलचे पुरावे संसदेत सादर करावेत, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
'जेव्हा तुम्ही एकदा खोटं बोलता. तेव्हा ते खोटं लपवण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा खोटं बोलावं लागतं. राफेल डीलवरुन पंतप्रधानांचा बचाव करण्याच्या प्रयत्नात संरक्षणमंत्री खोटं बोलत आहेत.