नवी दिल्ली - राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अडचणीत असलेल्या अनिल अंबानी यांना राफेल करारात भागीदारी देऊन देशाचे 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात घातले, आपल्या पदाचा असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणीही राहुल गांधी यांनी केला.
''भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात रिलायन्सचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केल्याचे फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी सांगितले होते. आता दसॉल्ट एव्हिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच हा खुलासा केला आहे. काँग्रेसने या प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र भाजपाने अशा चौकशीस तयारी दर्शवली नाही. मोदी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन सत्तेवर आले होते. मात्र आता तेच भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत. त्यांनी देशातील गरीब, शेतकरी वर्गाचा विश्वासघात केला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राफेल विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसमोर रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा सनसनाटी गौप्यस्फोट फ्रान्समधील मीडियापार्ट या संकेतस्थळाने केला होता. मीडियापार्टने दिलेल्या वृत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार दसॉल्ट एव्हिएशनसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहारकरण्याची अट घालण्यात आली होती. भागीदारीसाठी रिलायन्सशिवाय अन्य कोणताही पर्याय दसॉल्ट एव्हिएशनला देण्यात आला नव्हता. दसॉल्ट एव्हिएशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर नागपूर येथे ही माहिती दिल्याचा दावा मीडियापार्टने केला होता. मात्र दसॉल्ट एव्हिएशनने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही स्वायत्तपणे रिलायन्सची निवड केल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतातील संरक्षण खरेदीबाबतच्या नियमांचे पालन करण्यासाठी 50 टक्के ऑफसेट करार करणे बंधनकारक होते. त्यासाठी दसॉल्ट एव्हिएशनने एका संयुक्त कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रिलायन्स ग्रुपची निवड करण्यात आली, तसेच 10 फेब्रुवारी 2017 रोजी दसॉ रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड (DRAL) या कंपनीची स्थापना करण्यात आली, असे स्पष्टीकरण दसॉ एव्हिएशनने दिले आहे.