रायपूर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला. शनिवारी (17 नोव्हेंबर) सरगुजा येथे रॅलीदरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. कोणत्याही व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यासोबत 15 मिनिटं राफेल विमान करारावर चर्चा करावी, असं थेट आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे.
पुढे ते असंही म्हणाले की, मोदींनी कोणत्याही प्रदेशात 15 मिनिटांपर्यंत माझ्यासोबत उभे राहावे. 15 मिनिटं त्यांनी मला बोलू द्यावं आणि तेवढाच वेळ त्यांनाही बोलावं.
दरम्यान, शुक्रवारी(16 नोव्हेंबर) अंबिकापूरमध्ये प्रचारसभेदरम्यान जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनीही काँग्रेसला आव्हान दिले होते. " नेहरुंमुळे चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असे काँग्रेसवाले म्हणत आहेत. तर मग एकदा कुटुंबाबाहेरील कुठल्याही व्यक्तीला पाच वर्षांसाठी काँग्रेसचे अध्यक्षपद द्या." असे मोदींनी म्हटलं होतं.
पंतप्रधान मोदींच्या यांच्या आव्हानावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदबरम यांनी शनिवारी ट्विटरद्वारे उत्तर दिलं. त्यांनी आतापर्यंतच्या बिगर नेहरू-गांधी परिवारातील काँग्रेस अध्यक्षांची यादीच सादर केली आहे. त्याला उत्तर देताना चिदम्बरम यांनी १९४७ नंतर आचार्य कृपलानी, पट्टाभी सीतारमय्या, पुरुषोत्तमदास टंडन, यू एन धेबर, संजीव रेड्डी, कामराज, निजलिंगप्पा, सी. सुब्रमण्यम, जगजीवनराम, शंकरदयाळ शर्मा, डी. के. बरुआ, ब्रह्मानंद रेड्डी, पी. व्ही. नरसिंह राव व सीताराम केसरी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते, असा पलटवार केला आहे. मोदी यांची स्मरणशक्ती कमजोर असल्याचेही चिदम्बरम यांनी त्यांना सुनावले आहे.
या विषयावर बोलणार का?शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी, महिला तसेच मुलींवरील अत्याचार, गोरक्षकांचे तसेच दहशतवाद्यांचे सतत होणारे हल्ले, झुंडशाहीने हत्या या विषयांवर मोदी आता तरी बोलतील का, असा सवालही चिदम्बरम यांनी केला आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?
जवाहरलाल नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असा टोला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी नरेंद्र मोदींना लगावला होता. यावर, छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी थरूर यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. चार पिढ्या राज्य करणाऱ्यांनी आपल्या कामाचा हिशोब दिला पाहिजे, पण ते चार वर्षे काम करणाऱ्यांकडे हिशोब मागत आहेत, असा टोलाही मोदींनी यावेळी लगावला.
"आता काँग्रेसवाले म्हणताहेत की नेहरूंमुळे एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनला. आता तुम्ही जर लोकशाहीचा एवढाच सन्मान करत असाल तर एक छोटंस काम करा. जर तुम्ही पंडित नेहरू आणि संविधानामधील तुमच्या भूमिकेमुळे एक चहावाला पंतप्रधान बनला, असा दावा करत असाल तर केवळ एकदा कुटुंबाबाहेरील कुठल्याही व्यक्तीला पाच वर्षांसाठी काँग्रेसचे अध्यक्षपद द्या." असे आव्हान मोदींनी काँग्रेसला दिले होते.