राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'आता खरी खेळाला सुरुवात झालीय', या वक्तव्यावर भाजपने आक्षेप नोंदवला असून भारताच्या इतिहासात आजपर्यंच कोणत्याही विरोधी पक्षाच्या अध्यक्षाने देशाच्या पंतप्रधानांविरोधात अशा प्रकारची भाषा वापरली नसल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. तसेच आम्ही काँग्रेस पसरवत असलेल्या खोट्या गोष्टींना उघडे पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींसारखा बेजबाबदार आणि खोटारडा माणूस अध्यक्ष असणे ही बाब काँग्रेससाठी शरमेची आहे. नॅशनल हेराल्ड असो की बोफोर्स घोटाळा असो त्यांचा संपूर्ण परिवार घोटाळ्यांमध्ये बुडालेला आहे.
सोमवारी (24 सप्टेंबर) एका कार्यक्रमांतर्गत सोशल मीडिया वॉलिंटिअर्ससोबत संवाद साधताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ''आता तर फक्त सुरुवात झालीय, पुढे पाहा आणखी मजा येणार आहे. येणाऱ्या दोन-तीन महिन्यांमध्ये आम्ही तुम्हाला आणखी गंमत दाखवू. नरेंद्र मोदींची जी कामं आहेत... राफेल, ललित मोदी, विजय माल्या, नोटाबंदी, गब्बर सिंग टॅक्स या सर्वांमध्ये चोरीची कृती आहे. एक-एक प्रकरण बाहेर काढून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की हे नरेंद्र मोदी चौकीदार नाहीत, तर ते चोर आहेत''.