नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपांची तोफ डागली. राफेल डीलसाठी मोदी सरकारने फक्त अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचे नाव सुचवले होते. त्यामुळेच फ्रान्सच्या डॅसो एव्हिएशेन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असे विधान फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याचाच आधार घेत राहुल गांधी यांनी देशाचा चौकीदारच चोरी करून गेला, अशी टीका पंतप्रधानांचे नाव घेऊन केली.
भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही राहुल गांधीच्या सुरात सूर मिसळला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. राफेल डील प्रकरणावर आतातरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया द्यायला हवी असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद आणि नरेंद्र मोदी हे चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेकदा एकमेकांच्या गळ्यात-गळे घातले आहेत. त्यामुळे ओलांद यांच्या या दाव्यावर मोदींनीच उत्तर द्यायला हवे. त्यांच्याशिवाय अन्य कोणी यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.
दरम्यान, राफेल डीलसाठी अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या निवडीमध्ये फ्रान्सचा कोणताही हात नाही, असे फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनिल अंबानी यांचे नाव नरेंद्र मोदी यांनी पुढे केले होते. हे खरे आहे की खोटे, याचे स्पष्टीकरण मोदी यांनी द्यावे. देशाचा चौकीदारच चोर निघाला, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
अनिल अंबानी यांच्या कंपनीला एकही विमान बनविण्याचा अनुभव नाही. एचएएलला 70 वर्षांचा अनुभव आहे. ओलांद यांनी थेट आपल्या देशाचा आणि कंपनीचा अंबानींना निवडण्यात काहीही हात नसल्याचे स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ मोदी यांनीच अंबानींचे नाव सुचविले होते. मोदी यावर एकही शब्द का बोलत नाहीत. भारताच्या जवानांच्या आयुष्याचा, देशाच्या सुरक्षेचा आणि भ्रष्टाचाराचा हा प्रश्न आहे. मोदी यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.