नवी दिल्लीः आपल्या एकापेक्षा एक जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे ‘ब्रह्मास्र’ मानली जाणारी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर जेट आज भारतभूमीवर सुखरूप उतरली. फ्रान्सहून तब्बल सात हजार किलोमीटरचं अंतर कापून आलेल्या या पाच विमानांचं देशभरातून मनःपूर्वक स्वागत होतंय. भारताचं सामरिक सामर्थ्य राफेलच्या आगमनानं प्रचंड वाढलंय आणि स्वाभाविकच देशवासीयांचं मनोधैर्य उंचावलंय. देशाचा ऊर अभिमानानं भरून आलेला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संस्कृतमधील एका राष्ट्रभक्तिपर सुभाषितातून राफेलचं स्वागत केलं आहे.
राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम्, राष्ट्ररक्षासमं यज्ञो,दृष्टो नैव च नैव च।।
नभः स्पृशं दीप्तम्... स्वागतम्!
असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे. राष्ट्ररक्षणासारखं पुण्य नाही, राष्ट्ररक्षणासारखं व्रत नाही आणि राष्ट्ररक्षणासारखा यज्ञ नाही, असा या संस्कृत श्लोकाचा आशय आहे.
एका बाजूला कुरापतखोर पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला धूर्त चीन, असा शेजार असल्यानं भारताला अक्षरशः डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचं रक्षण करावं लागतंय. अशातच, गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर ड्रॅगनचे मनसुबे उघड झाले आहेत. भारतीय जवानांनी दाखवलेला हिसका आणि केंद्राच्या मुत्सद्देगिरीनंतर चीननं सैन्य मागे घेण्याची तयारी दाखवलीय. पण त्यांचा काही भरवसा नाही. या पार्श्वभूमीवर, राफेल विमानं लवकर पाठवण्याची विनंती फ्रान्सला केली होती. ती मान्य करून, फ्रान्सनं पाच विमानांची तुकडी काल रवाना केली होती. ही विमानं आज दुपारी साडेतीन वाजता ती हरयाणातील अंबाला एअरबेसवर लँड झाली. ते दृश्य भारतीयांचा आत्मविश्वास उंचावणारंच होतं.
तत्पूर्वी, राफेल विमानांनी भारताच्या आकाशात प्रवेश केला, तेव्हा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिडीओ ट्विट करून या विमानांचं स्वागत केलं होतं. पाच राफेल विमानांना दोन सुखोई विमानांनी एक्सॉर्ट केल्याचा तो क्षणही नेत्रदीपक होता.
अंबाला हवाई तळाचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. अंबालापासून चीन आणि पाकिस्तान अतिशय जवळ आहेत. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये अंबालातून आकाशात झेपावून राफेल विमानं शत्रूवर तुटून पडू शकतात.
राफेलसंबंधीच्या अन्य बातम्याः
राफेलचं आगमन होताच नेटीझन्स भावूक, मनोहर पर्रीकरांची झाली आठवण
'नरेंद्र मोदींमुळेच 'राफेल भारतात', पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाबद्दल आभार'
'राफेल गेमचेंजर ठरणार नाही, चीनचीही चिंता वाढेल असं वाटत नाही'; शरद पवारांचा दावा
'आता तरी किंमत सांगा...', राफेलवरून दिग्विजय सिंहांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
'राफेल'चे लँडिंग होताच शेजारील राष्ट्रांत भूकंप; भारतीय क्रिकेटपटूचं ट्विट व्हायरल
राफेल विमानाच्या टेलवर लिहिलेल्या RB आणि BS चा काय आहे अर्थ?