नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांमध्ये अनिल अंबानी आणि काँग्रेसमध्ये राफेल विमान खरेदी प्रकरणावर चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणी आता अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. नॅशनल हेरॉल्डमध्ये राफेल सौद्याबाबत प्रसिद्ध केलेल्या लेखाविरोधात रिलायन्स समूहाने हा दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेला लेख हा मानहानिकारक आणि अपमानजनक असल्याचं रिलायन्स समूहाचं म्हणणं आहे. हा दावे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या रिलायन्स डिफेन्स, रिलायन्स इन्फ्रास्टक्चर आणि रिलायन्स एअरोस्ट्रक्चर कंपन्यांद्वारे दाखल करण्यात आला आहे. शिवाय, गुजरात काँग्रेसचे नेते शक्तीसिंह यांच्याविरोधातही रिलायन्स समूहाने 5 हजार कोटी रुपयांचा आणखी एक मानहानीचा दावा दाखल केला आहे.
दिवाणी आणि सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून न्यायाधीश पी. जे. तमाकुवाला हे प्रकरण पाहणार आहेत. न्यायालयाने नोटीस जारी करून 7 सप्टेंबरपर्यंत यावर उत्तर द्यायला सांगितले आहे.
नेमके काय आहे लेखात?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल व्यवहाराची घोषणा केल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत अनिल अंबानी यांनी रिलायन्स डिफेन्स कंपनीची सुरूवात केली होती, असे नॅशनल हेरॉल्डच्या लेखात नमूद करण्यात आले आहे. यावर आक्षेप नोंदवत रिलायन्स समूहानं म्हटले आहे की, या लेखामुळे रिलायन्स समूह आणि समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची प्रतिमा खराब झाली आहे, असे सांगत नॅशनल हेरॉल्डविरोधात 5 हजार कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.