नवी दिल्ली : राफेल विमानांच्या करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चोर असल्याचे आरोप झाल्याने भाजप बॅकफूटवर गेली आहे. संजय भंडारी आणि रॉबर्ट वड्रा यांच्या कंपन्यांना मध्यस्थाची संधी न मिळाल्याने काँग्रेस राफेलवर राग काढत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी करत राफेल कराराच्या वादात उडी घेतली आहे.
नुकताच रविशंकर प्रसाद यांनी राफेल आणि रिलायन्स सहकार्य करार काँग्रेसच्या काळात झाल्याचा दावा केला होता. मात्र, संरक्षण मंत्राल्याच्या वेबसाईटवर असलेल्या नोंदीत राफेल करार भाजपच्या म्हणजेच मोदी सरकारच्या काळातच झाल्याचा उल्लेख असल्याने प्रसाद तोंडघशी पडले आहेत. यामुळे भाजपने आज नव्या मंत्र्यांना राफेल कराराची पाठराखण करण्यासाठी मैदानात उतरविले आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी पाकिस्तानचीच इच्छा असल्याचे म्हटले आहे.
आज सायंकाळी एका पत्रकार परिषदेमध्ये शेखावत यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत संजय भंडारी आणि रॉबर्ट वड्रा यांच्या कंपन्यांना काँग्रेस मध्यस्थ म्हणून वापरणार होती. मात्र, तशी संधी न मिळाल्याने राफेल करार रद्द करायला लावून काँग्रेस बदला घेत असल्याचा आरो शेखावत यांनी केला.
तर काँग्रेसचे प्रवक्ता रनदीप सुरजेवाला यांनी भाजप पुन्हा पाकिस्तानचा सहानुभुती मिळविण्यासाठी वापर करत असल्याचा आरोप केला. कृषीमंत्री संरक्षणाच्या विषयावर बोलत असून अंबानींना हमीभाव का दिल्याचे सांगत आहेत. उद्या शेतीबाबतच्या धोरणांवर संरक्षण मंत्री बोलल्या तर नवल वाटू नका, असे उपरोधीक ट्विटही त्यांनी केले आहे.