दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स मिळाल्यानंतर आम आदमी पार्टी भाजपावर सातत्याने जोरदार हल्लाबोल करत आहे. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकून भाजपा दिल्लीच्या 7 जागा आपल्या खिशात ठेवू इच्छित असल्याचं आप नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटलं आहे.
राघव चढ्ढा म्हणाले की, "आता पुढचा नंबर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा असेल. हेमंत सोरेन यांच्यानंतर राजदचे तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये अटक केली जाईल. हा क्रम इथेच थांबणार नाही, कारण यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना अटक होणार आहे. केरळमध्ये पिनाराई विजयन यांना अटक होईल, त्यानंतर तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांना अटक होईल."
"महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांना अटक होणार आहे. या राज्यांतील प्रमुख नेत्यांना अटक करून भाजपाला लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. राजकीय पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना अशा प्रकारे अटक केल्यास लोकशाहीचा पायाच डळमळीत होईल. भाजपाला पराभवाची भीती आहे. भाजप एकटाच शर्यतीत उतरला तर साहजिकच निवडणूक जिंकेल. विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकायचं आहे."
"इंडिया आघाडीचा एकही उमेदवार निवडणूक लढला तर भाजपाच्या जागा कमी होतील. अशा स्थितीत भाजपाला पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे भाजपा विरोधी आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकत आहे. कारण एखादा नेता तुरुंगात असेल तर तो निवडणूक लढवू शकणार नाही आणि कोर्टाच्या फेऱ्या मारत राहणार. या योजनेअंतर्गत भाजपा केजरीवाल यांना अटक करणार आहे."
"भाजपाचे पुढील लक्ष झारखंडवर आहे, 14 लोकसभा जागा असलेले राज्य. कारण या सर्व जागांवर भाजपाची अवस्था वाईट आहे. अशा स्थितीत ते हेमंत सोरेन यांना अटक करणार आहेत. गेल्या काही वर्षांत विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपा त्यांची पिळवणूक करत आहे. या नेत्यांनी शरणागती पत्करली नाही तर निवडणुकीच्या आसपास त्यांना अटक केली जाईल. या देशात एक पक्ष आणि एक नेता हे भाजपाचे उद्दिष्ट आहे. देशाची लोकशाही धोक्यात येईल" असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.